नाशिक : श्रावण सुरू झाला आणि सणांचीही सुरुवात झाली आहे. रक्षाबंधन या भावाबहिणीच्या पवित्र नात्याचा महत्वपूर्ण सण आज देशभरात साजरा केला जातोय. यंदा मात्र रक्षाबंधनापेक्षा अधिक चर्चा भद्रायोगाची किंवा आज असलेल्या भद्रा काळाची (Bhadra kal) अधिक होत आहे. रक्षाबंधनासाठी भद्रा काळ हा वर्ज्य असून त्यावेळेत किंवा आजच्या दिवशी राखी बांधणे व भावाला ओवाळणे अनुचित ठरेल असे मेसेज समाज माध्यमावर फिरत आहेत. मात्र, धर्म अभ्यासकांनी हे सर्व दावे खोडून काढले आहेत. नाशिक मधील प्रसिद्ध धर्मशास्त्र अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी भद्रायोग (Bhadra yog) हा दर राखी पौर्णिमेला असतोच त्यामुळे दिवसभरात कधीही राखी बांधने आणि भावाला ओवाळणे वर्ज्य नसल्याचे म्हंटले आहे.
डॉ. नरेंद्र धारणे यांनी म्हणतात की, बहिणीने भावाला राखी बांधायची आणि भावाने बहिणीचे रक्षण करणे आणि तीला वाईट शक्तिपासून सुरक्षित ठेवण्याचे वचन देण्याचा हा पवित्र सण आहे. परंतु आजकाल कोणीही नवीन धर्मशास्त्र तयार करून राखी पौर्णिमा बद्दल लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. विचित्र मेसेज समाज माध्यमावर टाकून त्यातून लोकांची श्रद्धा कमी होईल करणे तसेच सण साजरे केले जाऊ नये असा उद्देश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राखी पौर्णिमेला बहिणीने भावाला राखी बांधणे हा एक लौकिक विधी आहे. म्हणजे बहिणीने फक्त भावाच्या हाताला दोरा बांधण्याचा एक विधी आहे. त्यामध्ये कुठलेही मंत्र उपचार होत नाहीत किंवा कुठलाही विधी होत नाही. त्यामुळे त्याबद्दलचे भद्रा किंवा इतर कुठली मूहूर्त बघण्याची कोणतीही आवश्यकता नाही. त्यामुळे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कधीही राखी बांधून भावाला ओवाळावे असेही त्यांनी सांगितले.
आज काल भद्रा दोष सांगितला जातो, वास्तविक दर वर्षीच राखी पौर्णिमेला भद्रा असतेच मग इतके दिवस आपले पूर्वजांनी कोणतेही बंधने आपल्याला सांगितलेली नाहीत. ते वेडे होते का? आपण सर्वसामान्य व्यक्तींनी याचा विचार केला पाहिजे की आपण सण का साजरे करत आहोत. त्यामागचा उद्देश काय आहे. आणि त्यानुसार आपण पूर्णपणे आनंदाने आपले सण साजरे करावेत. दिवसभरात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राखी पौर्णिमा आपण साजरी करू शकतो. त्याबद्दल कुठलेही बंधन नाही आणि धर्मशास्त्रात कुठेही उल्लेख नाहीत हे मी माझ्या खात्रीने सांगू शकतो. : डॉ. नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक