राज्यपालांची बेछूट वक्तव्ये बनतायत भाजपाची डोकेदुखी!

ncp mahesh tapase Complained to the president draupadi murmu on Bhagat Singh Koshyari over Chhatrapati Shivaji's remarks

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. राज्यपालपदावर विराजमान झाल्यापासून कोश्यारींनी एकामागून एक बेछूट विधाने केली. त्यामुळे मराठीतून शपथ घेत आपले वेगळेपण दाखवणारे राज्यपाल आता वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून समोर येत आहेत. यात आता औरंगाबादमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे आणखी एक वादंग निर्माण झाला आहे. मात्र राज्यपालांची ही वक्तव्ये आता भाजपासाठी डोकेदुखी ठरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले, त्यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. कोश्यारींच्या या विधानामुळे आता भाजपा मात्र कोंडीत सापडला आहे.

शिवाजी जुन्या काळातले आदर्श

राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मानद डि.लिट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपालांनी नितीन गडकरी आणि शरद पवार यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो, तेव्हा आम्हाला शिक्षक विचारायचे, तुमचा फेव्हरेट हीरो कोण? त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र बोस, कोणाला पंडित जवाहरलाल नेहरू, तर कोणाला गांधीजी चांगले वाटायचे. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेव्हरेट हीरो कोण? तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही, महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हीरो मिळतील, शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत… मी नव्या काळाबद्दल बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरीपर्यंत आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले.

छत्रपती शिवरायांबद्दल यापूर्वी देखील वादग्रस्त विधान

राज्यपाल कोश्यारींनी औरंगाबादमध्ये 27 फेब्रुवारी 2022 रोजी श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल? गुरुचे आपल्या समाजात मोठं स्थान असतं, तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे, असं समर्थांना म्हटलं, असं विधान कोश्यारींनी केलं होतं. यावर वाद पेटल्यावरर पण नंतर या वादावर स्पष्टीकरणही त्यांनी दिलं होतं.

महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण 14 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे लग्न वयच्या 10व्या वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे 13 वर्ष होतं. त्यामुळे कल्पना करा लग्न झाल्यानंतर असे काय विचार करत असतील? एक प्रकारे तो कालखंड मूर्तीच्या पुढे फुलं वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असं विधान भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यानंतर भाजपाला सारवासारव करावी लागली.

मुंबईतील गुजराती- राजस्थानी नागरिकांचे कौतुक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 29 जुलै 2022 मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील दाऊद बाग जंक्शन चौकाच्या नामकरण सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांचे कौतुक करत एकप्रकारे मुंबई – ठाण्याचा अपमान केला. मी अनेक जणांना सांगतो. महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोक सोडून गेले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाहीत. तसेच मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण तशी ओळख राहणार नाही,” असं राज्यपाल म्हणाले होते. विशेष म्हणजे कोश्यारींनी केलेल्या विधानावेळी व्यासपीठावर भाजपचे आमदार नितेश राणे हे सुद्धा उपस्थित होते. यावर चौफेर टीका झाल्यावर त्यांनी माफी मागितली होती.

वाजपेयींचे कौतुक नेहरूंवर टीका

कारगिल विजयी दिवसानिमित्त राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारींनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर सडकून टीका केली होती. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार वगळता आधीचं सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हतं. असं म्हणत त्यांनी वाजपेयी सरकारचे कौतुक करत पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली. या कार्यक्रमावेळी देखील तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. पण भाजपालाच नंतर सारवासारव करावी लागली.


आजोबांनी दिलेला ‘ठाकरी’ बाणा, पुढच्या पिढीत आला…; राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट