Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र चंद्रकांत खैरेंच्या आरोपांवर भागवत कराडांचं प्रत्युत्तर, म्हणाले - "वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा"

चंद्रकांत खैरेंच्या आरोपांवर भागवत कराडांचं प्रत्युत्तर, म्हणाले – “वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा”

Subscribe

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राड्याचे मास्टर माईंड हे देवेंद्र फडणवीस असल्याचा थेट आरोप केला आहे. या आरोपावर केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राम नवमीच्या आदल्या दिवशी बुधवारी (ता. २९ मार्च) रात्री छत्रपती संभाजीनगर येथे क्षुल्लक कारणांवरून दोन गटांमध्ये वाद झाले. या वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने या दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, हा कट पुर्वनियोजीत होता, असा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून करण्यात आला आहे. तर या कटाचे खरे मास्टर माईंड हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा थेट आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. खैरेंच्या या विधानावरून केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तर कराडांनी खोचक टीका करत खैरेंच्या या विधानाचा समाचार देखील घेतला आहे.

चंद्रकांत खैरेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना भागवत कराड म्हणाले की, “राम नवमीच्या दिवशी किराडीपुरा येथील प्राचीन मंदिराजवळ जर कोणी असं केलं असेल तर त्याच्यावर कारवाई करावी, अशा सूचना मी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. खैरेंचा आरोप खोटा आहे. त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज आहे. तसेच ते जर यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप करत असतील तर त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे.”

- Advertisement -

तर, “महाविकास आघाडीच्या सभेची आम्हाला कल्पना आहे. त्यांचा कार्यक्रम वेगळा आहे. राम नवमीच्या कार्यक्रमाशी त्याला जोडणं चुकीचं आहे. खैरेंचं यासंदर्भातलं वक्तव्य चुकीचं आहे. आम्ही अशा प्रवृत्तीच्या माणसाला खासदार म्हणून निवडून दिलं, याचं आम्हाला वाईट वाटतं.” असे देखील यावेळी भागवत कराड यांच्याकडून सांगण्यात आले. महाविकास आघाडीची २ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे सभा होणार आहे. ही सभा होऊ नये, म्हणून भाजपने हा कट रचल्याचा आरोप देखील खैरे यांच्याकडून करण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जिनसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – दंगलीबाबत सूचना देऊनही दुर्लक्ष करण्यात आले – अंबादास दानवे

- Advertisment -