मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 50 जागाही जिंकता आल्या नाहीत. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जनतेची मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम निवडणूक आयोगाने केल्याचा आरोप केला आहे. यानंतर भाई जगताप यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रीय संस्थांना मोदींच्या दारातील श्वान म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत पोलीस आयुक्तांकडेही कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Bhai Jagtap criticism of the Election Commission and Kirit Somaiya complaint to the Police Commissioner)
भाई जगताप यांच्या वक्तव्याप्रकरणी माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले की, मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रारही दाखल केली आहे. निवडणूक आयोगाचा अपमान सहन केला जाणार नाही. भाई जगताप यांच्यावर कारवाई करायला हवी. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गट ईव्हीएम व निवडणूक आयोगाला लक्ष्य करत आहेत, कारण सर्वजण मार्च 2025मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना घाबरत आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.
हेही वाचा – Thackeray Brothers : निवडणुकीत पराभव झाल्याने…; ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत दानवेंचे सूचक वक्तव्य
सोमय्यांनी आयोगाला दिलेल्या पत्रात तकाय म्हटलं?
भाई जगताप यांच्या वक्तव्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले की, विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला बदनाम करण्याची मोहीम आता काँग्रेस, विरोधीपक्षाचे आमदार आणि आमदार भाई जगताप यांनी सुरू केली आहे. आमदार भाई जगताप यांनी निवडणूक आयोगाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा कुत्रा म्हटले आहे. निवडणूक आयोगाला असे कुत्रा म्हणणे म्हणजेच शिवी देणे, अवमान करणे हे संविधानात्मक संस्थेचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे भाई जगताप यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
काय म्हणाले होते भाई जगताप?
दरम्यान, एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना भाई जगताप यांनी निवडणूक आयोगाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, इतकी मोठी आपली लोकशाही आहे, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे जर लोकशाहीवर काही प्रश्न उपस्थित केले जात असतील, काही शंका असतील तर त्याचं उत्तर हे निवडणूक आयोगाला आणि सरकारला द्यावंच लागेल. खरं तर निवडणूक आयोग आणि जेवढ्या केंद्रीय संस्था आहेत, त्या सर्व श्वान होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्याबाहेर बसल्या आहेत. ज्या संस्था आपल्या लोकशाहीला मजबूत बनवण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्याच असा व्यवहार करत आहेत, अशी जहरी टीका भाई जगताप यांनी केली आहे.
हेही वाचा – Mahadev Jankar : “EVM हॅक करता येऊ शकते, आय एम अल्सो इंजिनियर, आय…”, महादेव जानकरांचा मोठा दावा