Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त मुंबई काँग्रेस १ हजार कुपोषित बालकांना दत्तक घेणार, भाई...

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त मुंबई काँग्रेस १ हजार कुपोषित बालकांना दत्तक घेणार, भाई जगताप यांची माहिती

घरांचा मालमत्ता कर संपूर्णपणे माफ करण्यात यावा

Related Story

- Advertisement -

काँग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई काँग्रेसतर्फे एक नवीन अभियान सुरु केले जाणार आहे. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये व आदिवासी पाड्यांमध्ये राहणारी हजारों बालके आज कुपोषित असल्याचे समोर आले आहे. अशा कुपोषित बालकांना सुदृढ करण्यासाठी १००० बालकांना दत्तक घेऊन त्यांना सुदृढ करण्याचा निर्धार मुंबई काँग्रेसने केला आहे. या बालकांना सुदृढ करण्यासाठी त्यांना पौष्टिक आहार देण्याची व त्यांच्या औषधोपचाराची सर्व जबाबदारी मुंबई काँग्रेसने घेतलेली आहे. या साठी मुंबईच्या ६ जिल्ह्यांमध्ये मुंबई काँग्रेसचे २०० पदाधिकारी स्वयंसेवक म्हणून नेमले जाणार आहेत व प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे ५ बालकांची जबाबदारी असणार आहे.

या अभियानाची सुरुवात उद्या शनिवार, दि. १९ जून २०२१ रोजी दुपारी ३ वाजता मुंबईतील आझाद मैदान जवळील, मुंबई काँग्रेस कार्यालयातून केली जाणार आहे व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील उपस्थित राहणार आहेत तसेच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत त्यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई महापालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर व सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे उपस्थित होते.

मालमत्ता कर वाढ प्रस्तावाला विरोध

- Advertisement -

भाई जगताप पुढे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिका पालिका स्थायी समिती मध्ये १६ जून रोजी मालमत्ता कर वाढी संबंधी मंजुरीसाठी प्रस्ताव आणला होता. पण सदर प्रस्ताव मुंबईकरांच्या हिताच्या विरुद्ध असल्याने मुंबई काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध केला. मालमत्ता कर संपूर्ण माफ करण्यात यावा हा ठराव याआधी २०१७ मध्येच पारित झालेला होता. तरीसुद्धा असे प्रस्ताव कसे काय मांडले जातात? आज मुंबईकर नागरिक किंबहुना महाराष्ट्रातील प्रत्येक नागरी मागील दीड वर्षांपासून कोरोना महामारीने त्रासलेला आहे. असे असताना सुद्धा १४ % मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव मांडणे ही मुंबईकर नागरिकांची शुद्ध फसवणूक आहे. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. काँग्रेस पक्ष हे कधीही खपवून घेणार नाही.

घरांचा मालमत्ता कर संपूर्णपणे माफ करण्यात यावा

मुंबईतील ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर संपूर्णपणे माफ करण्यात यावा व ५०१ ते ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करामध्ये ६०% सूट देण्यात यावी, अशी काँग्रेसची पूर्वीपासूनच मागणी राहिलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केलेली आहे की, मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या ठरावाप्रमाणे राज्य सरकारने त्वरित अध्यादेश काढून मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम १४० व १४०अ मध्ये सुधारणा करून ५०० चौ. फुटांपर्यंत सदनिका धारकांना संपूर्ण मालमत्ता कर माफ करावा तसेच ५०१ ते ७०० चौ. फुटांपर्यंत सदनिका धारकांना ६०% मालमत्ता कर माफ करावा. तसेच मालमत्ता कर आकारणीसाठी भांडवली मूल्य निश्चित करावे लागते. कोरोना काळातील मुंबईकरांच्या बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे भांडवली मूल्य, नियमावली निश्चिती पुढील ५ वर्षांकरिता सन २०२०-२०२५पर्यंत पुढे ढकलण्यात यावी.

- Advertisement -

त्याचप्रमाणे मुद्रांक शुल्क सिद्धगणकामधे (रेडीरेकनर) सुमारे ४०% पर्यंत बाजारभावाचे दर वाढलेले असल्यामुळे त्यावर आधारित इमारती व जमिनीचे भांडवली मूल्य निश्चित केल्यास मालमत्ता करामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे व याची झळ मुंबईतील इमारतींमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या मालमत्ता कराची झळ सोसावी लागणार आहे आणि म्हणूनच या प्रस्तावाला काँग्रेस पक्ष विरोध करत आहे. अशा काही मागण्यांचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आलेले आहे.

भाई जगताप पुढे म्हणाले की, आमचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त उद्या शनिवार, १९ जून रोजी रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून १००० बॉटल्स रक्त संकलित केले जाणार आहे. मुंबई काँग्रेसने यापूर्वी ११ एप्रिल ते २३ मे २०२१ पर्यंत संपूर्ण मुंबईत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांदरम्यान ७००० बॉटल्स रक्ताचे मुंबई काँग्रेसतर्फे संकलन करण्यात आले होते व त्यातील ९५% रक्त हे सरकारी रुग्णालये व रक्तपेढ्याना देण्यात आले तसेच ५% टक्के रक्ताचा पुरवठा खाजगी रुग्णालयांना करण्यात आला होता. उद्याचे रक्तदान शिबीर हे कुलाबा, धारावी, मालाड पश्चिम व वर्सोवा या विधानसभा क्षेत्रात हे संपन्न होणार आहे आणि १००० बॉटल्स रक्त संकलन सरकारी संस्थांना देण्यात येणार आहे.

- Advertisement -