मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजितदादा पवार ) आमदार आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार नाराज झाले होते. यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरात यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ले सुरूच होते.
यातच भरत गोगावे, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रालयात भेट घेतली आहे. यानंतर, ‘जे झाले ते झाले, आता जे काही होईल, ते चांगलं होईल,’ अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी व्यक्त केली आहे. गोगावले प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यामुळे पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावर एकप्रकारे पडदा पडल्याचं बोललं जात आहे.
तुम्ही आदिती तटकरेंना पालकमंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न करत आहात. यासह सुनील तटकरेंवर टीका करत आहात, असा प्रश्न विचारल्यावर गोगावले म्हणाले, “जे झाले, ते झाले, आता जे काही होईल, ते चांगले होईल. दोन दिवसांत पालकमंत्रिपदाबाबत निर्णय होईल. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होणार आहे.”
रायगडला सहपालमंत्रिपद भेटले तर तुम्ही त्या निर्णयाला सहमत असाल का? असे विचारल्यावर गोगावलेंनी म्हटलं, “आता तुम्हाला काही सांगत नाही. दोन दिवसांत पालकमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेते दोन दिवसांत निर्णय घेतील. सध्यातरी पालमंत्रिपदाचा वाद थांबला आहे.”
तुम्ही पालकमंत्री झाला, असे समाजायचे का? असा प्रश्न विचारल्यावर मिश्किलपणे गोगावले म्हणाले, “असे उलटे काही विचारू नको. जरा थांब, घाई कशाला करतो आहे… सकारात्मक बातमी मिळेल, असे वाटते आहे. निधीबाबत अजितदादांची भेट घेतली आहे.”