”आम्हाला पाय लावायचा प्रयत्न केला तर…,” भरत गोगावलेंची थेट विरोधकांना धमकी

जे काही आम्ही केलं नाही ते आमच्या माथ्यावर मारण्याचा जो काही केविलवाणा हे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आम्ही दोन्ही पक्षाच्या लोकांनी ठरवलं जी वस्तुस्थिती आहे ती समोर आणावी. म्हणून आज आम्ही बॅनरबाजी करून घोषणाबाजी केली. ते जेव्हा करत होते तेव्हा आम्ही कधी आलो नाही, असंही ते म्हणालेत

मुंबईः पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस हा सत्ताधाऱ्यांनी चांगलाच गाजवला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. सकाळपासून शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे आंदोलक सत्ताधाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. त्याचदरम्यान प्रताप सरनाईक आणि मिटकरी आमनेसामने आले, अखेर अजित पवारांनी मध्यस्थी करून दोघांनाही शांत केलं. पण या सर्व प्रकरणात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी विरोधकांना इशारा दिलाय.

गोगावले म्हणाले की, घोषणाबाजीचा कार्यक्रम ठेवलेला होता. दोन्ही पक्ष शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केलं. तुम्ही पाहताय गेल्या तीन-चार दिवसांपासून हे रोज पायऱ्यांवर बसून आघाडीतले तिन्ही पक्षाचे लोक गद्दार, गद्दार, खोके बिके सगळे बोलत होते. जे काही आम्ही केलं नाही ते आमच्या माथ्यावर मारण्याचा जो काही केविलवाणा हे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आम्ही दोन्ही पक्षाच्या लोकांनी ठरवलं जी वस्तुस्थिती आहे ती समोर आणावी. म्हणून आज आम्ही बॅनरबाजी करून घोषणाबाजी केली. ते जेव्हा करत होते तेव्हा आम्ही कधी आलो नाही, असंही ते म्हणालेत.

आता आम्ही 165 ते 170 लोक आहोत. ते किती आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. 107 ते 99 अशी ती लोक होती. अशा वेळेला आम्ही 170 लोक आलो असतो तर काय झालं असतं. आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांनी यायची गरज नव्हती, याचा अर्थ त्यांना झोंबलं, मिरची चावल्यानंतर जशी झोंबते, तशी त्यांना ते झोंबली. कारण त्यांचा सगळा इतिहास आम्ही बाहेर काढला. कोरोनाच्या काळापासून सिंचन घोटाळ्यापर्यंत सगळा घोटाळा बाहेर काढला. अनिल देशमुख असतील, नवाब मलिक असतील. सचिन वाझे असतील, बेस्ट समित्या असतील, अनिल परब असतील ही वस्तुस्थिती मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला, आमचं पुरं होऊन द्यायचं मग त्यांनी यायला पाहिजे होतं. पायऱ्या मोकळ्या करून दिल्या असत्या, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आम्ही बोलतोय त्यात येऊन गोंधळ घालायचा, तुमच्या सगळ्यांचं लक्ष विचलित करायचं हा कुठला प्रकार आहे. मग आम्ही काय बांगड्या भरल्यात. म्हणून जशास तसं उत्तर आम्ही आता त्यांना दिलेलं आहे. त्यांनी आमचा नाद करायचा नाही. आम्ही कोणाला पाय लावत नाही, चुकून पाय लागला तर नमस्कार करू, पण आम्हाला पाय लावायचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही. जो येईल अंगावर त्याला घेऊ शिंगावर मग तो कोणी का असेना, असा इशाराही त्यांनी दिलाय.


हेही वाचाः लाईफलाईन हॉस्पिटल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सुजित पाटकांविरोधात गुन्हा दाखल