घरताज्या घडामोडीसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे?

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे?

Subscribe

रविवारी होणार नाव निश्चित; साहित्य महामंडळाच्या बैठकीत फैसला

नाशिकमध्ये होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे नाव रविवारी (दि. २४) नाशिकमध्ये आयोजित बैठकीत जाहीर होणार आहे. जयंत नारळीकर, भारत ससाणे आणि जनार्दन वाघमारे यांची नावे स्पर्धेत असली तरीही भारत सासणे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव निश्चित होण्याची दाट शक्यता आहे.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दररोज नवनव्या नावांची चर्चा होत आहे. यात प्रामुख्याने अनिल अवचट, मनोहर शहाणे, यशवंत मनोहर, डॉ. रवींद्र शोभणे, प्रेमानंद गज्वी यांच्या नावांची चर्चा होती. साहित्य महामंडळाच्या घटक संस्था; तसेच संलग्न व समाविष्ट संस्थांकडून ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, विज्ञानवादी लेखक डॉ. बाळ फोंडके, कथाकार भारत सासणे, प्रख्यात लेखिका सानिया, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे आणि लेखक जनार्दन वाघमारे यांच्या नावांचा प्रस्ताव महामंडळाकडे आला आहे. संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. दिग्गज नावांमुळे सन्मानाने निवड करताना महामंडळाचा कस लागणार आहे. अंतिम टप्प्यात आता इतर सर्व नावे मागे पडून संमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रामचंद्र देखणे, ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन वाघमारे यांची नावे विविध साहित्य संस्थांकडून पुढे आलीत. पण मराठवाडा साहित्य परिषदेतून मात्र संमेलनाध्यक्षाबाबत मौन पाळले जात आहे. त्यामुळेच मराठवाडा साहित्य परिषदेकडून कोणाचे नाव यंदा पुढे होणार आहे, याबाबत उत्सुकता आहे. २४ जानेवारी रोजी नाशिक येथे होणार्‍या बैठकीत संमेलनाध्यक्ष कोण होणार, याला पूर्णविराम मिळणार आहे.

भारत सासणेच का?

संमेलनस्थळ जाहीर होताच भारत सासणे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आले होते. घुमान संमेलनातील मानापमान नाट्यामुळे, महामंडळ अध्यक्षांची पसंती त्यांच्याच नावाला असल्याचेही बोलले जाते. विदर्भ साहित्य संघासाठीही विषय असल्याने घटकसंस्था म्हणून भारत सासणे यांचे नाव सुचवण्यात आले आहे. स्वागताध्यक्ष म्हणून छगन भुजबळ यांच्याच नावाची चर्चा आहे. अध्यक्षपदासाठी जेव्हा निवडणुका घेतल्या जात होत्या, तेव्हा विदर्भ साहित्य संघ ज्या उमेदवाराला पाठिंंबा जाहीर करेल, तोच उमेदवार अध्यक्षपदी विराजमान होत असल्याचा इतिहास आहे. मात्र जेव्हापासून निवडणुका बाद करण्यात आल्या, तेव्हापासून चित्र बदलले आहे. महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघ यांच्यात सासणे यांच्या नावावरुन एकमत होत असल्याने सासणेच अध्यक्ष होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

 

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे?
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -