“१०० बापांची पैदास नसेल, तर…” भास्कर जाधव यांचे मोहित कंबोज यांना आव्हान

भाजपचे मोहित कंबोज आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यामध्ये एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी भास्कर जाधव यांच्यावर केलेल्या आरोपानंतर त्यांनी देखील कंबोज यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

Bhaskar Jadhav challenges Mohit Kamboj

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटात जाण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना किमान १०० वेळा फोन केले असा आरोप ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत केला. पण कंबोज यांनी केलेल्या या आरोपांना भास्कर जाधव यांनी काही तासांतच सडेतोड उत्तर दिले आहे. मोहित कंबोज हा जर १०० बापांची पैदास नसेल, तर त्याने एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा, असे थेट आव्हान जाधव यांच्याकडून देण्यात आले आहे. विधानसभेच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधताना भास्कर जाधव यांनी कंबोज यांच्यावर हल्लाबोल केला.

मोहित कंबोज यांच्या आरोपांवर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, “मोहित कंबोज हा फडतूस माणूस आहे. त्याने माझ्यावर केलेला एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा. भाजपकडे भरमसाठ पैसा आहे. तपास यंत्रणा आहेत आणि सत्तेची मस्तीही आहे. मात्र, मी एक सामान्य माणूस आहे. मी तत्वाकरिता लढतो. तुमच्याकडे असलेल्या तपास यंत्रणा माझ्या मागे लावा, 100 सोडा, जर मी एकनाथ शिंदेंना पाच फोन जरी केले असतील, तर राजकीय जीवनातून मुक्त होईन.”

“मोहित कंबोज हो बोलवता अनाजीपंत आहे, त्या अनाजीपंतांनाही मी सांगतो, तुम्ही या महाराष्ट्राची संस्कृती संपवायला आहेत. पण माझ्यासारखे 100 भास्कर जाधव उभे राहतील. माझ्यावर खोटे आरोप करून तुम्ही माझी कारकीर्द संपवू शकत नाही. कंबोजसारख्या फडतूस माणसाने आरोप केल्यानंतर माझी नाही, तर अनाजीपंतांची प्रतिमा डागाळली जात आहे,” असे म्हणत भास्कर जाधव यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत भास्कर जाधव यांच्यावर आरोप केले होते. “खिस्यानी बिल्ली खम्बा नोचे! ही म्हण आज भास्कर जाधवांना लागू होते. गेल्यावर्षी जून 2022 मध्ये भास्कर जाधव यांनी शिंदे किमान 100 वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून वेगळा झाला होता. आज हाच गट शिवसेना आहे. त्यावेळी भास्कर जाधवांनी शिंदे गटात सामील होण्याचं निवेदन दिलं होतं.” असा आरोप कंबोज यांनी केला होता.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांना किती फोन केले?, मोहित कंबोजचा जाधवांना सवाल

या व्हिडिओमध्ये कंबोज पुढे म्हणाले होते की, “पण एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार भास्कर जाधवांना आपल्या समवेत घेण्यास राजी नव्हते. कारण प्रत्येकाला वाटत होतं, की भास्कर जाधवांवर विश्वास ठेवू शकत नाही. आज भास्कर जाधव जेवढी बडबड करत आहेत. पण त्यावेळी ते तिकीट काढून गुवाहाटीला येण्यास निघाले होते.” तर “जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या गटात घेणार नाहीत, तोपर्यंत मी गुवाहाटीतील हॉटेल रेडिसनच्या बाहेर बसणार, असं भास्कर जाधव म्हणत होते. त्यांच्याबरोबर दुसरे नेते सुनील राऊतही होते,” असा गंभीर आरोप मोहित कंबोज यांच्याकडून करण्यात आला होता.