घरताज्या घडामोडीमंत्रिपद मिळाले असते तर उद्धव ठाकरेंनाच फायदा झाला असता - भास्कर जाधव

मंत्रिपद मिळाले असते तर उद्धव ठाकरेंनाच फायदा झाला असता – भास्कर जाधव

Subscribe

ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर महा विकास आघाडीतील तीनही पक्षांचे काही नेते नाराजी व्यक्त करत आहेत. तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केल्यामुळे तीनही पक्षातील काही मोजक्याच नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यामुळे मंत्रिपदाची आस लावून बसलेले नेते आपली नाराजी आता प्रकट करत आहेत. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या भास्कर जाधव यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. “मला मंत्रिमंडळात स्थान दिले असते, तर माझ्या अनुभवाचा फायदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नवे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनाच झाला असता”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिली आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणे देखील टाळले होते.

वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भास्कर जाधव म्हणाले की, “मी नाराज नाही, पण मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या विधानसभेतील आमदारांपैकी सर्वात जास्त वेळा निवडून आलेलो मी आमदार आहे. मला प्रशासनाचा अनुभव असून उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे मला कॅबिनेटमध्ये संधी मिळेल. या माध्यमातून माझ्या अनुभवाचा फायदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सहकार्य करु शकेल असे मला वाटत होते. मात्र तसे झाले नाही.”

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी प्रदेशाध्यक्ष पदापासून ते कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत अनेक पदे भुषविली होती. मात्र तरिही मेरिटवर मला मंत्रिपद मिळाले नाही का? याचा आता मी विचार करतोय. योग्यतेमध्ये किंवा नेत्याचा विश्वास संपादन करण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडलो की काय? याबद्दल माझ्या मनात अनेक शंकाकुशंका निर्माण झाल्या. या शंकेतूनच मी शपथविधीला गेलो नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी वेळ मागितलेली आहे. त्यांचा वेळ मिळाल्यानंतर निश्चितच याची चर्चा करणार असल्याची माहिती भास्कर जाधव यांनी दिली.

भास्कर जाधव रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघाचे आमदार आहेत. जिल्ह्यातील त्यांचे प्रतिस्पर्धी उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. तसेच काँग्रेसमधून आलेले अब्दुल सत्तार यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. या दोन्ही नेत्यांपेक्षा वरिष्ठ असलेल्या भास्कर जाधव यांना डावलल्यामुळे ते नाराज झाले असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -