नितीन देशमुखांवर कलम 353 नुसार कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करा; भास्कर जाधवांची मागणी

Bhaskar Jadhavs demand Suspend the officer who prosecuted mla Nitin Deshmukh under Section 353

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे अकोला बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्याविरोधात काल पोलीस कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आयपीसीच्या कलम 353, 186, 448, 294, 506 आणि 34 या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेच प्रकरण आज आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत उचलून धरत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन करत, कलम 353 अ रद्द करण्याची मागणी केली. भास्कर जाधव या मुद्द्यावरून यावेळी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आमदारांना रेल्वे, गाडी प्रवास करत असताना अथवा एखाद्या कामकाजात सहभाग घेण्यापासून रोखलं तर सभागृहात अनेकदा हक्कभंग आला आहे. मुंबईतील विधिमंडळात 353 अ हे कलम काढून काढण्याचा मुद्दा मांडला, ते कलम का काढून टाकावं हा मुद्दा जेव्हा मांडला तेव्हा संपूर्ण सभागृहातील सदस्यांच्या ज्या व्यथा मी मांडल्या त्याच सर्वांच्या होत्या त्यामुळे हे कलम काढून टाकण्याचा एकमुखी सूर लावला आणि पुढाकार घेतला. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यावेळी काम करत असताना कशा प्रकारच्या अडचणी येतात आणि काम करायचं नसेल तर सरकारी अधिकारी ३५३ चा गैरवापर करून आपल्याला कसा त्रास देतात. याचे अनेक किस्से झाले.

कलम ३५३ अ शिथिल करा

त्यामुळे ३५३ ठेवून त्यातील ३५३ अ काढावं, कारण ३५३ अ नुसार जोर बोललो तरी सरकारी कर्मचारी माझ्यावर तक्रार दाखल करु शकतात. जोर बोललो, जोरात पेपर आपटले तरी अटक केली जाते, एखाद्याने सहज पाणी उडवलं तरी अटक होते. त्यामुळे हे कलम शिथिल करा अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांना एवढं डोक्यावर चढून कसं घेऊ शकता

यावेळी नितीन देशमुखांवरील दाखल गुन्हाबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, काल विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या बंगल्यावर उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती, या बैठकीसाठी नितीन देशमुख काही जास्त लोकांना घेऊन गेले होते. यावेळी त्या लोकांनाही आत सोडण्याची मागणी नितीन देशमुख करत होते. पण कामावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांने त्यांना आयडी विचारला, त्यावेळी त्यांनी विधानसभेचा बॅच दाखवला त्यावेळी पोलिस अधिकारी म्हणाला की असला बॅच मला माहित नाही तुला दिलेलं कार्ड दाखव, असा शब्दप्रयोग त्यांनी केला, त्यावेळी तू तू में में झालं. ८.१५ वाजता घटना घडली त्यानंतर ११.३० वाजता त्यांच्यावर ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, आज ते सभागृहात येऊ शकत नाही कारण पोलीस कुठल्याही क्षणी अटक होईल. अधिकाऱ्यांना एवढं डोक्यावर चढून कसं घेऊ शकता, असा आक्रमक सवालही भास्कर जाधव यांनी केली आहे.

ज्या पोलीस अधिकाऱ्याने कारवाई केली त्याला तात्काळ निलंबित करा

अधिवेशन काळात आमदारांवर ३५३ नुसार गुन्हा कसा दाखल होतो? हा प्रश्न तुमच्या बाबतीत घडेल, माझ्याबाबतीत घडेल, आपण एकमेकांवर टीका करू , पण अधिकाऱ्यांना एवढं मुजोर करू ठेऊ नका. अँटीसिपेटरी बेलसाठी मंत्री कोर्टात जाऊ शकत नाही कारण कोर्टाबाहेर पोलीस उभे आहेत. कुठलं राज्य चालू आहे. यात कुठल्या राजकारण्याचा सहभाग आहे असं म्हणणार नाही, पण ज्या अधिकाऱ्याने ही कारवाई केली त्याला तात्काळ निलंबित अशी मागणी भास्कर जाधव यांनी सभागृहाच्यावतीने केली आहे.


शिंदे गटातील खासदारावर लैंगिक शोषणाचा आरोप; पण राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप