प्रश्नपत्रिका इंग्रजीत, पण उत्तरे मराठीत लिहा; भवन्स महाविद्यालयाचा अजब फतवा

सर्व संलग्न महाविद्यालयांनी त्यांच्या नावाचे फलक मराठी भाषेमध्ये लावावेत, असे आदेश मुंबई विद्यापीठाने दिले आहेत. मात्र मुंबई विद्यापीठापासून काही अंतरावर असलेल्या भारतीय विद्या भवनचे गिरगाव चौपाटी येथील हजारीमल सोमाणी महाविद्यालय म्हणजेच भवन्स महाविद्यालयाने प्रथम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांना मराठीमधून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे परीक्षेवेळी येणारी अडचण लक्षात घेता मराठीमधून शिकण्याला प्राधान्य देणार्‍या विद्यार्थ्यांसमोर परीक्षा कशी द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मराठीतून फलकाचा घाट घालणार्‍या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

गिरगाव चौपाटी येथील भवन्स महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कला शाखेच्या प्रथम वर्षाची परीक्षा ऑफलाईन घेण्याबाबत 1 एप्रिलला नोटीस काढली. त्यामुळे संपूर्ण वर्षभर ऑनलाईन शिक्षण घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका कशी असेल, मराठीमध्ये उपलब्ध होईल का? यासंदर्भात प्राचार्यांकडे विचारणा केली असता त्यांनी प्रश्नपत्रिका इंग्रजी भाषेमध्येच उपलब्ध होईल, मात्र तुम्ही उत्तरपत्रिका मराठीमध्ये लिहू शकता, असे त्यांना सांगितले. प्रश्नपत्रिका इंग्रजी भाषेमध्ये मिळत असल्याने ऐन परीक्षेवेळी इंग्रजीतील प्रश्न समजून घेऊन ते मराठीमध्ये भाषांतर करणे आणि त्यानंतर उत्तर लिहिण्यास घेणे यासाठी खूप वेळ लागेल.

त्यामुळे पेपर पूर्ण सोडवणे शक्य होणार नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याची विनंती प्राचार्यांना केली. मात्र प्राचार्यांनी ही विनंती धुडकावून लावल्याने अखेर विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन युवासेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात, डॉ. धनराज कोहचाडे आणि संतोष धोत्रे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक यांची भेट घेऊन भवन्सच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला.
मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेतून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतो. मात्र भवन्स महाविद्यालय कला शाखेतील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यमातून का उपलब्ध करून देते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कला शाखेतील बर्‍याच विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका लिहिण्याची भाषा मराठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजीमधील प्रश्न समजून घेऊन उत्तरे लिहिण्यात अडचणी येऊन त्याचा परिणाम त्यांच्या गुणांवर होण्याची शक्यता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच मराठी भाषेतून उत्तरपत्रिका लिहिणार्‍या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन भवन्स महाविद्यालयाला मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती युवासेनेने केली.

विद्यार्थ्यांना मराठीमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. तसेच मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी भाषेमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आदेश परीक्षा विभागाला देण्याचे आश्वासन कुलसचिव सुधीर पुराणिक यांनी युवासेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
– अ‍ॅड. वैभव थोरात, युवासेना सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ