“…तर आम्ही त्यांना सोडणार नाही”, राज ठाकरेंच्या भूमिकेवर भीम आर्मीचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला विरोध करणाऱ्या भीम आर्मीने आता मनसेसोबत थेट दोन हात करण्याचा इशारा दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला विरोध करणाऱ्या भीम आर्मीने आता मनसेसोबत थेट दोन हात करण्याचा इशारा दिला आहे.

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना नम्र विनंती करतो की आजच्या आज राज ठाकरे आणि त्यांच्या चेलेचपाट्यांना, कार्यकर्त्यांना अटक करा. उद्या जर त्यांच्यामुळे या देशात हिंदू-मुस्लीम दंगली घडल्या, कुणाचं रक्त सांडलं, तर याद राखा, आम्ही त्यांना सोडणार नाही. आमचा आणि त्यांचा संघर्ष अटळ आहे”, असं भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी म्हटलं.

भीम आर्मीकडून राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला विरोध करण्यात आला होता. राज ठाकरेंनी सभेसाठी दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यास त्याच सभेत शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाने घोषणाबाजी करून सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मीने दिला होता. यावर राज ठाकरे यांनी सभेदरम्यान उपस्थितांमध्ये काहीसा गोंधळ पाहाताच “मनसेच्या सभेत काही वेडं-वाकडं कराल तर चौरंग बनवून घरी पाठवेन”, अशा शब्दांत गोंधळ घालणाऱ्यांची कानउघाडणी केली होती.

“आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर काम करतो. लोकांमध्ये जाऊन काम करतो. लोकांमध्ये प्रबोधनाचं, बंधुभावाचं काम करतो. हा देश एकसंघ राहावा यासाठी मेहनत घेतो. अशा वेळी असं घाणेरडं राजकारण राज ठाकरे करत असतील, त्यांच्यामुळे दंगल होत असेल तर आमचा आणि त्यांचा संघर्ष अटळ आहे”, असा इशारा देखील कांबळे यांनी दिला आहे.

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. 1 मे 2022 रोजी राज ठाकरेंनी औरंगाबमध्ये सभा घेतली होती. औरंगाबादच्या सभेला परवानगी देताना पोलिसांनी अटी घातल्या होत्या एकूण 16 अटींपैकी 12 अटींचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांना आढळले आहे. राज ठाकरेंच्या भाषणाची औरंगाबाद पोलीस आयुक्त निखील गुप्ता पडताळणी करत होते. कायदेशीर भाग तपासल्यानंतर राज ठाकरेंवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच जुन्या प्रकरणांमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना देखील नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – ‘राज्यात ठाकरे सरकारचा शब्द चालेल, अल्टिमेटम नाही’; संजय राऊतांचा मनसेना टोला