आर्थिक अडचणींमुळे कोरेगाव-भिमा चौकशी आयोगाचं काम बंद?

भिमा-कोरेगाव प्रकरणी नेमण्यात आलेल्या पटेल आयोगाने पैसे नसल्यामुळे कामकाज थांबवल्याचं सांगण्यात येत आहे.

Bhima Koregaon Vijay Din (Photo Courtesy - Sanket Shinde)
विजयदिन साजरा करणारे हजारो भीमसैनिक (फोटो - संकेत शिंदे)

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने परस्पर एल्गार परिषदेचा तपास राज्य पोलीस विभागाकडून एनआयए अर्थात केंद्रीय तपास संस्थेकडे सोपवलं आहे. या पार्श्वभूमीवर आता १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भिमामध्ये झालेल्या दंगलीचा तपास करणाऱ्या आयोगाचं काम देखील उद्यापासून बंद होणार आहे. आजचा आयोगाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस होता. मात्र, आर्थिक समस्येमुळे आयोगाचं काम बंद होणार असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी दिली आहे. त्यामुळे एल्गार परिषद तपासानंतर यासंदर्भातला दुसरा एक तपास राज्य तपास यंत्रणेकडून संपुष्टात येणार आहे.

आयोगाच्या अध्यक्षांची नाराजी

कोरेगाव-भिमामध्ये नक्की काय झालं होतं? याचा तपास करण्यासाठी या दोन सदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये न्या. जे. एन. पटेल हे अध्यक्ष होते, तर माहिती आयुक्त सुमीत मलिक सदस्य होते. मात्र, आता आयोगापुढे आर्थित समस्या असल्याचं अध्यक्ष पटेल यांनी सांगितलं आहे. ‘सरकारकडून आयोगाच्या अडचणींकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आर्थिक अडचण आहे. कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यासाठी पैसे नाहीत. खर्चासाठी पैसे नाहीत. बिलं मंजूर होत नाहीत. त्यामुळेच आजचं शेवटच्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर इथून पुढे आयोगाकडून कोणतंही काम केलं जाणार नाही’, असं न्या. जे. एन. पटेल यांनी यासंदर्भातल्या कामकाजावेळी सांगितलं आहे.