भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट

ओबीसी आरक्षणाच्या मुददयावर सकारात्मक चर्चा

ओबीसी आरक्षणाच्या मुददयावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ओबीसी आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेनात ओबीसी आरक्षणाच्या मुददयावरून भुजबळ फडणवीस आमने सामने आले. यावेळी निर्माण झालेला गदारोळ संपूर्ण राज्याने बघितला. ओबीसी आरक्षणाच्या मुददयावर भाजपने चक्का जाम आंदोलनाची हाक दिली मात्र भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याची ऑफर देत, ते आमचे बॉस आहेत हवे तर सर्व श्रेय त्यांनी घ्यावे पण आमचे आरक्षण वाचवावे असे सांगितले. मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा फडणवीस यांनी केंद्राकडून डाटा आणून द्यावा. आमचे सरकार त्या आधारे इम्पिरिकल डाटा तयार करून दोन महिन्यांत आरक्षण देईल असेही भुजबळ म्हणाले. त्यामुळे फडणवीस यांनी पुढाकार घेवून केंद्राकडून डाटा आणावा याकरीता आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. केंद्राने लगेच डाटा दिला तर दोन महिन्यांत सरकार हे आरक्षण पुन्हा बहाल करून दाखवेल असे आव्हान भुजबळ यांनी दिले. त्यामुळे या सर्व पार्श्वभुमीवर आज झालेली भुजबळ फडणवीस भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

यावेळी भुजबळ आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. एकमेकांशी वाद घालण्यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस कारवाई करण्याची गरज असल्याचे भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.