घरताज्या घडामोडीभुजबळ म्हणतात, शिवसेना संपणार नाही!

भुजबळ म्हणतात, शिवसेना संपणार नाही!

Subscribe

बाळासाहेब ठाकरेंकडून लढवय्या बाणा, तर शरद पवारांकडून शाश्वत विकासाची शिकवण

आज शिवसेना नसती तर छगन भुजबळ कुठे तरी नोकरी करत असता. नव्वदच्या दशकात शिवसेनेत दत्ता साळवी, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ, नारायण राणे असा तोफखाना होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा एक वेगळा वचक होता. कालांतराने बाळासाहेब गेले, पक्षातून भुजबळ गेले, राणे गेले अगदी स्वतःचा सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे तेही गेले. परंतु तितक्याच धडाडीने ताकदीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना वाढवली इतेच नव्हे तर बाळासाहेबांना भगवा फडकवण्याचे स्वप्नही त्यांनी पूर्ण केले. त्यामुळे शिवसेना कधी संपणार नाही असे प्रामाणिक मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त ‘आपलं महानगर- माय महानगर’ने भुजबळ यांच्याशी संवाद साधला.

आपल्या राजकीय जीवनात आलेल्या आठवणींना उजाळा देताना भुजबळ म्हणाले, माझ्या राजकीय जीवनातील जडणघडणीत दोन व्यक्तींचा वाटा फार मोठा आहे. एक म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. बाळासाहेबांनी तेव्हा केवळ मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना हेच एकमेव ध्येय घेऊन शिवसेनेची स्थापना केली. पुढे काय होणार हे खुद्द बाळासाहेबांनाही माहीत नव्हते. पण मी शिवसेनेचा नगरसेवक, दोन वेळा महापौर, आमदार झालो. बाळासाहेबांच्या मुशीत आम्ही तयार झालो. आज जर शिवसेना नसती तर मीदेखील इंजिनिअरींग करून कुठे तरी नोकरी करत असतो. पण, शिवसेनेमुळे सामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढायला शिकलो. बाळासाहेबांकडून लढण्याची धडाडी मिळाली. परंतु, मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून माझा संघर्ष झाला अन् मी शिवसेनेतून बाहेर पडलो. त्यावेळी पवार साहेबांनी ओबीसी समाजाला आरक्षण देऊन मला दिलेला शब्द पूर्ण केला. त्यावेळी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणीही पवार साहेबांनी पूर्ण केली. सत्तेत असताना शाश्वत कामे कशी करायची, लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे याचे धडे पवारांकडून मिळाले. त्यामुळे या राज्याला ठाकरे अन् पवारांशिवाय पर्याय नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळात काम करताना सगळ्यांना पुढे घेऊन ते जात आहेत. राजकीय मैदाने गाजवण्याबरोबर राज्य शकट यशस्वीपणे ते सांभाळत आहेत. मागील एक वर्षाच्या कालावधीत सर्व खात्यांचा त्यांनी परिपूर्ण अभ्यास करून निर्णय ते घेत आहेत. विशेष म्हणजे, भाजपकडून वेगवेगळ्या मार्गाने सरकारवर हल्ले होत असताना त्याला उद्धव ठाकरे समर्थपणे तोंड देत आहेत. निश्चितपणे हे सरकार यशस्वीरित्या पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, यात शंका नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

विलासरांबरोबर काम करण्याचा आनंद

आजपर्यंत सात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम करण्याची मला संधी मिळाली. ९१ मध्ये सुधाकरराव नाईक होते. त्यावेळी मी अगदी नवखा होतो. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री अन् मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या काळात मी घेतलेल्या निर्णयाला विलासरावांनी कधीही विरोध केला नाही. अनेकदा तर मी त्यांना न सांगता माझ्या अधिकारात निर्णय घेतले त्यावेळी गृहखातेही माझ्याकडे होते पण विलासरावांनी कधी त्यावर आक्षेप न घेता सतत माझ्या मागे उभे राहिले त्यांच्याबरोबर काम करण्याचा क्षण आनंददायी होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -