Big B च्या सुरक्षा रक्षकाला खरच कोट्यावधींचा पगार ? चौकशी अहवाल पोलिस आयुक्तांना सादर

big b

जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसाच्या वार्षिक कमाईबद्दल गेल्या काही दिवसात प्रसारमाध्यमांतून बातम्या व्हायरल झाल्या होत्या. या बातम्यांमध्ये पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांना अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी वर्षाला दीड कोटी रूपये मिळत असल्याचा आरोप झाला होता. या आरोपानंतर मुंबई पोलिसांकडून शिंदे यांची चौकशी लावण्यात आली होती. शिंदे यांनी चौकशीला सामोरे जात आपली बाजू मुंबई पोलिसांसमोर मांडली. पण झालेले आरोप खोटे असल्याचा अहवाल समोर आला आहे. आरोपात तथ्य नसल्याचे चौकशीत समोर आल्याचा पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्यात आला आहे. हे आरोप झाल्यानंतर जितेंद्र शिंदे यांची बदली करून त्यांना डी बी मार्ग पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले होते.

अमिताभ बच्चन यांचे सुरक्षा रक्षक असलेले शिंदे हे 2015 पासून बच्चन यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत होते. बच्चन यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांना वार्षिक दीड कोटी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे आरोप झाल्यानंतर जितेंद्र शिंदे यांची तिथून बदली करून डी बी मार्ग पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले होते. महिन्याला 12 लाख शिंदे यांना मिळत असल्याचा आरोप झाला होता. चौकशीदरम्यान पगारादरम्यान अशी कोणितीही रक्कम त्यांच्या खात्यात आढळून आली नाही. आरोपात तथ्य नसल्याच चौकशीत समोर आले आहे. शिंदे यांची खाजगी सुरक्षारक्षक पुरवण्याची कंपनी आहे, असाही आरोप झाला होता. पण या सगळ्या आरोपांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान पोलिस दलाने सादर केलेल्या अहवालात कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वर्षापोटीचा असणारा पगार आणि सुरक्षा रक्षक कंपनी पुरवण्याच्या कंपनीचा आरोपही खोडून निघाला आहे.

अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच गेल्या काही दिवसात शाहरूख खानचा सुरक्षा रक्षक असलेला रवी सिंहही चर्चेत आला होता. आर्यन खानला जामीन मिळताना रवी सिंहवर विश्वास दाखवत त्यानेच आर्यन खानला आर्थर रोड जेल येथून घरी नेले होते. त्यामुळेच आर्यन खानला हा सुरक्षा रक्षक देतानाच शाहरूख खान नव्या सुरक्षा रक्षकाचा शोध घेत असल्याचा बातम्या आल्या होत्या.