आज (ता. १९ मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमधील गोळीबार मैदान येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेमधून ते नेमके कोणावर निशाणा साधणार आणि काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण असे असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. खेडमधील एका मोठ्या स्थानिक नेत्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्याने पक्ष प्रवेशाचे वारे उलट्या दिशेने वाहायला लागलेत, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
खेडचे आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे दापोली नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. प्रशांत कुसाळकर यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश हा खेडमध्ये स्थानिक पातळीवरील शिंदेंसाठी जोरदार धक्का असल्याचे बोलले जात आहे. कुसाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेआधीच ठाकरे गटात प्रवेश केल्याने याबाबतची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. प्रशांत कुसाळकर यांचा स्थानिक पातळीवर प्रभाव असल्याने याचा फायदा नक्कीच ठाकरे गटाला होणार आहे.
दरम्यान, 5 मार्चला माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेडच्या गोळीबार मैदानावर जाहीर सभा घेतली होती. या सभेमधून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर निशाणा साधला होता. त्यामुळे याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील याच गोळीबार मैदानावर आज सभा होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या सर्व नेत्यांच्या, आमदारांच्या आणि खासदारांच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात येणार आहे. मुळात शिवसेनेचे रामदास कदम यांचा बालेकिल्ला असलेल्या खेडमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेण्याआधीच रामदास कदम यांच्याकडून आजच्या सभेची घोषणा करण्यात आलेली होती. त्यामुळे या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम देखील नेमकं काय बोलणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा – ठाकरेंना उत्तर देण्यासाठी खेडच्या त्याच मैदानात आज सभा; काय बोलणार मुख्यमंत्री?