शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; २० सनदी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Education Minister praises staff for saving life of woman who suicide attempt in mantralaya

मुंबई – राज्य सरकारने बुधवारी २० सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. २९ सप्टेंबर रोजी ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता लगेचच हे मोठे प्रशासकीय फेरबदल शिंदे-फडणवीस सरकारने केले आहेत.

मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांना आता वैद्यकीय शिक्षण मुंबईचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले असून मुंबईच्या जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे ठेवण्यात आला आहे. वीरेंद्र सिंग यांना महाआयटी मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मिताली सेठी यांना वनामती नागपूरच्या संचालकपदाची, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुशील चव्हाण यांच्याकडे विकास आयुक्त असंघटित कामगार या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अजय गुल्हाने यांना नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदाची तर दीपक कुमार मीना यांना अतिरिक्त आदिवासी आयुक्त ठाणे या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विनय गौडा यांना चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तर आर.के.गावडे यांना अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

माणिक गुरसळ यांना अतिरिक्त आयुक्त उद्योग, शिवराज पाटील यांना महानंदचे महाव्यवस्थापकीय संचालक तर आस्तिक कुमार पांडेय यांना औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

लीना बनसोड यांना आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या महाव्यवस्थापकीय संचालकपदी तर दीपक सिंगला यांना एमएमआरडीए मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. एल.एस. माळी यांना ओबीसी बहुजन कल्याण संचालनालय पुणे संचालकपदी,एस.सी.पाटील यांना उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय येथे सहसचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे. डी.के.खिल्लारी यांना सातारा जि.प.च्या मुख्याधिकारीपदी,एस.के.सालीमठ यांना सिडको मुंबईच्या सह महाव्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्यात आले आहे. एस.एम.कुर्तकोटी यांना नंदूरबार जि.प.च्या मुख्याधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. बी.एच.पालवे यांना पालघर जि.प.च्या मुख्याधिकारीपदी तर आर.एस.चव्हाण यांना मुद्रांक आणि वनविभाग मंत्रालयच्या सहसचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे.