घरताज्या घडामोडी१५ ऑगस्टपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री १० पर्यंत खुले राहणार

१५ ऑगस्टपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री १० पर्यंत खुले राहणार

Subscribe

मॉलमधील सर्व दुकान, शॉपमध्ये कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती राहणार

राज्यात मिशन बिगेन अगेन प्रमाणे कोरोना निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले होते. अनेक जिल्ह्यांत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्यामुळे पुन्हा निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र यावेळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल सध्या ४ वाजेपर्यंत सुरु होतं मात्र आता १५ ऑगस्टपासून १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला आहे. राज्यमंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मॉल्स सुरु करण्यात आले असून केवळ दोन लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे.

राज्यमंत्रि मंडळ बैठकत १५ ऑगस्ट पासून राज्यातील सर्व हॉटेल आणि उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत उघडी राहणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या वेळा ४ पर्यंत ठेवण्यात आल्या होत्या त्यामध्ये बदल करुन रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. आता निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. राज्य सरकारविरोधात हॉटेल व्यावसायिकांनी केलेल्या आंदोलनांना आणि मागणीला यश आलं आहे. राज्यात हळूहळू सर्व सुरळित करण्यात येणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होते. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या वेळा वाढवून द्याव्यात अशी विनंती केली होती.

- Advertisement -

मॉल्स सुरु पण…

राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मॉल्स सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. मॉलमध्ये ५० टक्के लोकांना जाता येणार आहे. मॉलमधील सर्व दुकान, शॉपमध्ये कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती राहणार असून केवळ २ लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये देखील ५० टक्के लोकांची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. मात्र राज्य सरकारने सिनेमा, नाट्यगृह सुरु करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. राज्य सरकारने लग्न सोहळ्यासाठी ५० टक्के लोकांची उपस्थिती ठेवण्यास परवानगी दिली आहे. धार्मिक स्थळांबाबत सध्या निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

रेल्वेला तीन महिन्यांच्या पासच्या सूचना

ज्या नागरिकांनी दोन डोस घेतले आहेत आणि दोन डोस घेऊन १५ दिवस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अशा नागरिकांना पास देण्यात येणार आहे. रेल्वेकडून पास देण्यात येईल तसेच लसधारकाच्या प्रमाणपत्रानुसार पास देण्यात येईल. राज्य सरकारकडून रेल्वे प्रशासनास १ आणि तीन महिन्यांच्या पासच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पासची वैधता पडताळणीबाबत रेल्वेला अधिकार देण्यात आले आहेत. पास ज्या दिवसापर्यंत असेल त्याच दिवसापर्यंत नागरिकांना प्रवास करता येणार आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -

मंत्रिमंळाचा मोठा निर्णय

हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार
रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के उपस्थिती, मॉल्समध्ये दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश
हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांचे लसीचे दोन डोस झालेले असणं बंधनकारक
दुकाने रात्री १० वाजेपर्यंत खुली
दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी
लोकलसाठी मासिक आणि तीन महिन्यांचे पास देण्याच्या सूचना
खुल्या प्रांगणातील विवाह सोळ्यांना २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी
बंद मंगल कार्यालयातील विवाह सोळ्यांना बैठक क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी
सिनेमागृह, नाट्यगृह, धार्मिक स्थळं पुढील आदेशापर्यंत बंद
इनडोअर खेळ सुरु ठेवण्यास परवानगी
खासगी कार्यालयांना २४ तास सुरु ठेवण्याची मुभा
कार्यालयात २५ टक्के क्षमतेनं शिफ्ट्स मध्ये काम कामाच्या सूचना

लोकल ट्रेन सुविधा वापरासाठी खालील अटी व शर्ती

आरोग्य सेवा देणारे अधिकारी / कर्मचारी / अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा व दुसरी मात्रा (डोस) घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकलट्रेन प्रवास अनुज्ञेय करण्यात येत आहे. ज्या कर्मचारी अथवा नागरिक यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पुर्ण झाले आहे त्यांना लसीकरणाच्या अंतिम प्रमाणपत्राच्या आधारे लसीकरण प्रमाणपत्र व आस्थापनांच्या ओळखपत्रासह स्वतंत्रपणे राज्यशासनाने ठरवून दिलेल्या यंत्रणेमार्फत विहीत कार्यपध्दतीने (ऑनलाईन ऑफलाईन) प्रमाणित केलेल्या ओळखपत्र धारकानांच लोकलट्रेन प्रवासासाठी मासिक/ त्रैमासिक पास देण्यात यावेत. (असे प्रमाणित ओळखपत्र प्राप्त करण्याबाबतच्या तपशीलवार व स्वयंस्पष्ट सूचना प्राधिकाऱ्यांकडून स्वतंत्रपणे प्रसारीत करण्यात येत आहे. रेल्वे तिकिट तपासनीस यांना लसीकरण पूर्ण झाल्याचे नमूद केलेले ओळखपत्र तपासण्याचा अधिकार असेल. ज्या प्रवाशांकडे असे ओळखपत्र नसेल किंवा प्रवाशांकडून ओळखपत्र खोटे आढळल्यास त्यांच्याकडून तसेच ज्यानी खोटे प्रमाणपत्र प्रमाणीत केले असेल त्यांचेकडून रु. ५००/- इतका दंड तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार कारवाई करण्यात यावी.

उपहारगृहे

खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.

अ) उपहारगृह बारमध्ये प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल.

फ) उपहारगृह बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचान्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह / बारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल.

क) वातानुकुलित उपहारगृह / बार असल्यास, वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल.

ड) प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहिल,

इ) उपहारगृह बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी.

फ) उपहारगृह / बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहिल. उपरोक्तनुसार उपहारगृहे / बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह/बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री ९.०० वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

दुकाने :

राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.

शॉपिंग मॉल्स

राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.

जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा:

अ) वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास, वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील.

इनडोअर स्पोर्टस:

इनडोअर स्पोर्ट्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच, या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.

कार्यालय / औद्योगिक / सेवाविषयक आस्थापना :

अ) सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पुर्ण करण्यात यावे

ब) ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

क) सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे ज्या आस्थापना वरील कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी कार्यालयात काम करणे आवश्यक

कर्मचाऱ्यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे.

तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सूरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.

८) राज्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाटया, समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.

विवाह सोहळे:

अ) खुल्या प्रांगणातील /लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण / लॉन / मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

ब) खुल्या प्रांगण / लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या

५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल.

क) बंदिस्त मंगल कार्यालय /हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त

१०० व्यक्ती या मर्यादित असेल.

मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकान्याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल/ कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

तसेच मंगल कार्यालय/हॉटेल/लॉन व्यवस्थापन / भोजन व्यवस्थापन /बँडपथक/भटजी/फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधीत सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पुर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.

सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स :

राज्यात सिनेमागृह / नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ( स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

धार्मिक स्थळे :

राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.

आंतरराज्य प्रवास:

ज्या नागरिकांचे कौविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पुर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहिल.

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे, इ. वरील निर्बंध कायम राहतील.

मेडीकल ऑक्सीजनची उपलब्धता मर्यादीत असल्याने, जर राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यास व

कोविङ रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन ७०० मे. टन किंवा व त्यापेक्षा जास्त ऑक्सीजन लागत असल्यास

संपूर्ण राज्यात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करुन त्यानुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येतील.

राज्यातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारिरीक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध, इ. सर्व निर्बंधांचे पालन करणे अनिवार्य राहिल.

सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक/ व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पुर्ण होऊन १४ दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचाऱ्यांची यादी (लसीकरण) माहिती/प्रमाणपत्रासह) तयार ठेवावी व सक्षमप्राधिकाऱ्यांनी तपासणी साठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करुन द्यावी.

दुकाने / उपहारगृहे / बार /मॉल्सचे/कार्यालये/औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालीक निर्जतूकीकरण व सैनीटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधीत मालकाची व व्यवस्थापनाची असेल. तसेच, यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड / कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच यामध्ये मास्क डिस्पेंसर व बायोमेडीकल वेस्ट (वापरलेले मास्क व टिशु पेपर्स इत्यादीची विल्हेवाट) जमा करण्याची व विहित कार्यपध्दतीने विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी संबंधीत आस्थापनांची असेल.

उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग अधिनियम आणि भारतीय दंडसंहिता १८६० मधील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -