घरताज्या घडामोडीआमदार रवी राणांच्या अडचणीत वाढ, मतदानापूर्वीच अटक करण्याची महाविकास आघाडीची खेळी?

आमदार रवी राणांच्या अडचणीत वाढ, मतदानापूर्वीच अटक करण्याची महाविकास आघाडीची खेळी?

Subscribe

विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच एकीकडे महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना सुरू आहेत. तर दुसरीकडे काही अपक्ष आमदार मतदानाचा हक्क बजावणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या देखील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मतदानापूर्वीच त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.

रवी राणा यांनी विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.  माझं मतदान महाविकास आघाडीला जावं, यासाठी माझ्यावर दबाव टाकण्याचं काम सुरू आहे. ज्याठिकाणी राज्यसभेत संजय पवारांना मतदान झालं. त्याठिकाणी मंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली असून त्यामुळे संजय पवारांना मतदान झालं आहे. खासदार संजय राऊत काल बोलले होते की, रवी राणा आमच्या पायाशी येतील. परंतु एक लक्षात ठेवा ज्या जनतेने तुम्हाला संपूर्ण विश्वासाने निवडून दिलं. ५६ वर्षानंतर पहिल्यांदाच तुम्ही या जनतेला धोका दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ही जनता पायाशी घेईल, हे लक्षात ठेवा. ज्या लोकांना तुम्ही खोटी आश्वासनं दिली. तसेच त्यांची दिशाभूल करून त्यांचे आमदार निवडून आणले. त्या जनतेला वाऱ्यावर सोडून जे ५६ वर्षांत बाळासाहेबांनी केलं नाही, ते तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महागठबंधन करून या काँग्रेसच्या पायाशी जाण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे, असं राणा म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : खार पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरुद्ध दाखल केले आरोपपत्र

मी दोन दिवस मुंबईच्या बाहेर होतो आणि मुंबईच्या बाहेर राहून आज थेट मतदानासाठी आलो आहे. भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील, अशी माझी खात्री आहे. हनुमान चालिसा मी राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आत घेऊन गेलो होतो. आता सुद्धा घेऊन जाणार, असं रवी राणा म्हणाले.

- Advertisement -

राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर महापालिका आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट घेऊन अमरावती पोलीस रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील घरी पोहोचले होते. मात्र, राणा यांच्या घरी कुणीच नसल्याने पोलिसांना तसेच माघारी परतावे लागले होते. यामुळे रवी राणा आज मतदान करण्यासाठी विधान भवनात येणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. परंतु आता ते विधानभवनात दाखल झाले असून मतदान करणार का?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : भाजपला मतदान करू नये, यासाठी अटकेचा प्रयत्न; आमदार रवी राणांचा आरोप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -