मुंबई – अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. सैफ अली खान देखील सहा दिवसांच्या उपचारानंतर घरी परतला आहे. मात्र सैफ अली खानवर हल्ला करणारा म्हणून ज्याला पकडण्यात आले आहे त्या मोहम्मद शरीफुल शहजादचा चेहरा सैफच्या घरातील सीसीटीव्हीत कैद झालेल्या व्यक्तीशी जुळत नसल्याचा दावा केला जात आहे. तर दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेल्या सैफ अली खानच्या फिटनेसबद्दल शंकायुक्त आश्चर्य व्यक्त केले आहे.
मुंबई पोलिसांनी ठाण्यातून मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला अटक केली. तर सैफवर हल्ला करुन त्याच्या बंगल्यातून बाहेर पडणारा सीसीटीव्हीत कैद झाला, या दोघांचे फोटो जुळत नसल्याचा दावा केला जात आहे. भास्कर डॉट कॉमने न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या मदतीने दोघांच्या फोटोंचा अभ्यास केला. त्यात दोघांचे चेहरे एकसारखे वाटत नसल्याचा दावा केला आहे.
ठाण्यातून पकडण्यात आलेल्या मोहम्मद शहजादने ओळख लपवण्यासाठी केस कापल्याचा दावा सुरुवातीला पोलिसांकडून करण्यात आला होता. सीसीटीव्हीतील व्यक्ती आणि पकडण्यात आलेला शहजाद या दोघांत फक्त एवढाच फरक नाही तर, ब्रिलियंट फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन प्रायव्हेट लिमिटेडने दोघाचे फोटो तपासले. त्यात त्यांनी चेहऱ्याचा जणू एक्सरेच काढला आहे. त्यातून त्यांनी काही दावे केले आहेत, ज्यावरुन सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली व्यक्ती आणि पकडलेला शहजाद यांचे चेहरे जुळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
नाक-डोळे-ओठ असा आहे फरक
मोहम्मद शहजाद याच्या कपाळाचा आकार मोठा आहे, तर सीसीटीव्हीतील व्यक्तीचे कपाल लहान आहे. दोघांच्या भुवयांमध्येही फरक असल्याचे न्यायवैद्यक पथकाने म्हटले आहे. शहजादच्या भुवयांमध्ये फार कमी अंतर आहे, तर सीसीटीव्हीत कैद झालेल्याच्या भुवयांमध्ये अंतर जास्त दिसत आहे. शहजादचे डोळे बदामाच्या आकाराचे आहेत, तर सीसीटीव्हीतील व्यक्तीचे गोल असल्याचा त्यांचा दावा करण्यात आला आहे. शहजादचे नाक रुंद आहे तर सीसीटीव्हीतील व्यक्तीचे निमुळते आहे. शहाजदचे ओठ बदामाच्या आकाराचे आहेत तर सीसीटीव्हीत दिसणाऱ्याचे ओठ बो शेपमधील आहे. दोघांच्या चेहऱ्यात कुठेच साम्य दिसत नाही, असा दावाच खासगी फॉरेन्सिक पथकाने केला आहे.
दोन्ही शिवसेनेच्या आजी – माजी खासदारांचे सवाल
दवाखान्यातून सुटी मिळालेल्या सैफची चाल आणि फिटनेस पाहून दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी ज्याच्यावर हल्ला झाला ती हीच व्यक्ती आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे माजी खासदार संजय निरुपम यांनी सैफ अली खानची चाल, हातवारे आणि एकंदर दवाखान्यातून सुटून आलेला सैफ हा एका मोठ्या ऑपरेशननंतर बाहेर पडला, असे वाटत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. सहा दिवसांत चाकू हल्ल्यातील जखमी सैफला बरे केले हा लीलावतीतील डॉक्टरांचा चमत्कार आहे, असं संजय राऊत म्हणाले. तर संजय निरुपम यांनी स्वतः सैफ, त्याचे कुटुंबिय किंवा डॉक्टरांनी तो एवढ्या लवकर बरा कसा झाला हे सांगावे असे म्हटले आहे.
हेही वाचा : Saif Ali Khan : या अभिनेत्याची कंपनी पुरवणार सैफ अली खानला सुरक्षा