घरमहाराष्ट्रमुंबई महापालिकेकडून 'जी-20'साठी 35 कोटींची उधळपट्टी; माजी विरोधी पक्षनेत्याचा आरोप

मुंबई महापालिकेकडून ‘जी-20’साठी 35 कोटींची उधळपट्टी; माजी विरोधी पक्षनेत्याचा आरोप

Subscribe

मुंबई : भारताला यंदाचे जी-20चे यजमानपद मिळाले आहे. या जी-20च्या काही बैठका मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या निमित्ताने मुंबईत देश-विदेशातील मान्यवर, पाहुणे यांचे आगमन होणार आहे त्यासाठी मुंबई महापालिकेकडून मुंबईत अनेक ठिकाणी सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, विद्युत रोषणाई, स्वच्छता आदी कामे करण्यात आली आहेत. मात्र या सर्व कामांसाठी पालिकेने तब्बल 35 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. या कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीचा हिशोब द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

मुंबईत जी-20 परिषदेच्या काही बैठका बीकेसी येथे घेण्याचे नियोजन भारत सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मात्र बीकेसी येथे जी-20 परिषदेची बैठक घेण्यापूर्वी मुंबई महापालिकेकडून काही महत्त्वाच्या ठिकाणी रस्तादुरुस्ती, खड्डे भरणे, स्वच्छता ठेवणे, काही ठिकाणी विद्युत रोषणाई करणे, रस्त्यांची दुरुस्ती, रस्ते, पदपथ, वाहतूक बेटे यांचे सुशोभीकरण आदी कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. मुंबईत विदेशी पाहुणे या जी-20 परिषदेला येणार आहेत, ही चांगली व स्वागतार्ह बाब आहे. मात्र या सर्व कामांसाठी पालिकेने जनतेकडून कर रूपाने जमा केलेल्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

- Advertisement -

पालिकेने आतपर्यंत किमान 35 कोटी रुपयांची उधळपट्टी केली आहे, असा दावा रवी राजा यांनी केला आहे. वास्तविक, महापालिकेला जी-20 परिषदेच्या बैठकांसाठी काही विकास कामे करायची होती तर, त्यासाठी अगोदर टेंडर का काढले नाही? त्याबाबत पालिकेने आपल्या वेबसाइटवर सर्व माहिती का दिली नाही? कोणत्या कामांसाठी पालिकेने कुठे कुठे, किती व कसा खर्च केला, याची माहिती उघड करायला पाहिजे, असे सवाल रवी राजा यांनी उपस्थित केले आहेत.

जी-20साठी आलेल्या पाहुण्यांना येथील झोपडपट्टी दिसू नये म्हणून तिथे पडदे लावण्यात आले आहेत. इव्हेंट होणार असल्याच्या ठिकाणी जे झेंडे लावण्यात आले आहेत त्या एका झेंड्यासाठी पालिकेने 24 हजार रुपये मोजल्याची माहिती मिळते. तसेच, पालिकेने मुंबईत प्रदूषणाचा टक्का वाढू नये म्हणून काही दिवस इमारत बांधकामे थांबविण्यात आली आहेत. डेब्रिज वगैरे घेऊन जाणाऱ्या गाड्या सोडल्या जाऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. जी-20साठी आलेल्या पाहुण्यांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून पालिकेकडून असे निर्बंध घालण्यात आले आहेत. मग आम्ही माणसं नाही का? आम्ही तर येथे कायमस्वरूपी राहणारी माणसे आहोत, आम्ही प्रदूषण सहन करायचे का? त्यासाठी तुम्ही काही करणार नाही, असेही रवी राजा यांनी सुनावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -