उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वायकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेच्या अन्वेषण विभागाने आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीसह इतरांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. जोगेश्वरीतील भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वायकर यांच्या भूखंड घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्राथमिक तपास करण्यात आला होता. याप्रकरणी वायकर यांचा जबाबही नोंदवण्यात आला होता. त्यामुळे वायकर उच्च न्यायालयात गेले होते. पण तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर आता थेट आर्थिक गुन्हे विभागाने त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केल्यानं खळबळ उडाली आहे.
(हेही वाचा: काय गं विचित्राबाई…, ठाकरे गटाचं चित्रा वाघ यांना ‘त्या’ वक्तव्यावरून चोख प्रत्युत्तर )
प्रकरण काय?
रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन लाख स्क्वेअर फूटाच्या भूखंडावर जोगेश्वरीत हॉटेल बांधायची परवानगी घेतली होती. याप्रकरणी वायकर यांनी महापालिकेची फसवणूक केली होती.
लहान मुलांच्या खेळण्याच्या मैदानावर हॉटेलची बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. 11 मार्च 2023 रोजी सोमय्या यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला होता. त्यानंतर महापालिकेनं दोन महिन्यांपूर्वी वायकरांना दिलेली परवानगी रद्द केली होती.
500 कोटींचा घोटाळा?
रवींद्र वायकर यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. गार्डनसाठी आरक्षित भुखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यास मंजुरी मिळवून 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.