विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा उद्यापासून स्थगित, कारणही आलं समोर

Mumbai University Exam Postponed | स्थगित केलेल्या सर्व परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असं मुंबई विद्यापीठच्या जनसंपर्क विभागाने सांगितलं आहे.

Mumbai University Exam Postponed | मुंबई – मुंबई विद्यापीठाअंतर्गत (Mumbai University) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांत मोठी बातमी आहे. ३ फेब्रुवारी पासूनच्या सर्व परीक्षा स्थगित (Exam Postponed) करण्यात आल्या असून पुढील परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असं मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितलं आहे.

अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने २ फेब्रुवारीपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या हिवाळी सत्राच्या विविध विद्याशाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.


शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर गेल्यामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२३ पासून स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असं मुंबई विद्यापीठच्या जनसंपर्क विभागाने सांगितलं आहे.

दरम्यान, आज २ फेब्रुवारी रोजी परीक्षा सुरळीत पार पडल्या. परंतु, दरम्यान, अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या कधी मान्य होणार?, असा सवाल उपस्थित केला गेला. त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.