Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मोठी बातमी! साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदम ईडीच्या ताब्यात, अनिल परबांच्या अडचणी वाढणार?

मोठी बातमी! साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदम ईडीच्या ताब्यात, अनिल परबांच्या अडचणी वाढणार?

Subscribe

रत्नागिरी – दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. सदानंद कदम हे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे भाऊ आहेत. सदानंद कदम हे अनिल परब यांचा व्यावसायिक पार्टनर असल्याने ईडीने त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी सातत्याने अनिल परबांवर आरोप केले आहेत. हे आरोप करताना त्यांनी सदानंद कदम यांच्यावरही बोट दाखवलं होतं. सदानंद कदम हे अनिल परबांचे व्यावसायिक भागीदार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे सदानंद कदम यांच्यावर झालेली ही कारवाई ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. सकाळी साडेसात वाजता कुडोशी येथे अनिकेत फार्म हाऊस या सदानंद कदम यांच्या निवासस्थानी ईडीचं पथक आलं होतं. सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन हे पथक आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांची खेडमधील सभा यशस्वी करण्याकरता सदानंद कदम यांचा हात होता, म्हणूनच सुडबुद्धीने ही कारवाई झाली असल्याची प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली.

साई रिसॉर्ट बांधकाम, जमीन हस्तांतरण प्रकरणी अनिल परबांवर आरोप केला जात आहे. मात्र, माझा या रिसॉर्टशी संबंध नाही. जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असं अनिल परबांनी आधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे याप्रकरणात आता सदानंद कदम यांची चौकशी सुरू झाल्याने अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल परबांवर शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात फसवणूक करत बनावट कागदपत्रांच्या आधारे एक रिसॉर्ट बांधल्याचा आरोप होत आहे. 2017 मध्ये अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी भूखंड विकत घेतला आणि कोरोनादरम्यान लॉकडाऊनच्या काळात या शेतीच्या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्याचे काम केले.

मिळालेल्या माहितीनुसार, जमीन खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी 2019 मध्ये याची नोंदणी झाली आणि त्यानंतर 2020 मध्ये ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर आणि शिवसेनेचे माजी खासदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ही जमीन 1.10 कोटींना विकण्यात आली. दरम्यान किरीट सोमय्यांकडून हे रिसॉर्ट पाडण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या मते रिसॉर्टच्या बांधकामातून पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे परब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) 26 मे रोजी अनिल परब यांच्या सात ठिकाणी छापेमारी केली. तसेच त्यांच्या साथीदारांच्या घरांवरही छापे टाकून चौकशी केली. दरम्यान परब यांनी जमीन खरेदीपासून ते बांधकामात अनियमितता केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. मात्र परब यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत सोमय्या यांच्यावर मानहानीचा दावाही दाखल केला आहे.

- Advertisment -