नागपूर : महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुका काही महिन्यांपूर्वी पार पडल्या. या निवडणुकीनंतर आता महापालिकेची निवडणूक कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या राज्यातील सर्वच पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता ठाकरे गटाकडून आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Big news Shiv Sena uddhav Balasaheb Thackeray group will contest local body elections on its own says sanjay Raut)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नागपुरात नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महापालिकेच्या निवडणुकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट पण स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार, “मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला पाहायचंच आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
नेमकं संजय राऊत काय म्हणाले?
“मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपपले पक्ष मजबूत करावेत”, असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – Sanjay Raut : भाजप-ठाकरे गटाची जवळीक वाढली; राऊतांकडून फडणवीसांचे सातत्याने कौतुक