मोठी बातमी! दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर मुंबई पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली

मुंबई – शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याकरता शिवसेना आणि शिंदे गटाने परवानगी मागितली होती. दसरा मेळाव्याकरता दोन्ही गटामध्ये संघर्ष निर्माण होऊन रस्सीखेच सुरू होती. मात्र, मुंबई पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणं दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा होता. त्यामुळे कोणाही एका गटाला परवानगी दिल्यास दुसऱ्या गटातील कार्यर्त्यांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. जी/ उत्तर विभाग कार्यालयाने शिवसेनेच्या उद्धव व शिंदे गटांना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याबाबत परवानगी देण्यास नकार दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर संपूर्ण शिवसेनाच हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यावरही कब्जा केला होता. दसरा मेळावा घेण्यासाठी पालिकेची परवानगी मिळविण्यासाठी २२ ऑगस्ट रोजीच्या पालिकेच्या जी/ उत्तर विभाग कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. त्यानंतर शिंदे गटाने ३० ऑगस्ट रोजी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा अर्ज जी/ उत्तर विभाग कार्यालयाला सादर केला होता.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या सभेवर भाजपचा निशाणा; आशिष शेलारांनी ट्विटरद्वारे सेनेवर प्रश्नांचा भडिमार

नंतर शिवसेनेतर्फे पालिकेला दोन वेळा स्मरण पत्रही पाठविण्यात आली होती. परवा उद्धव ठाकरे गटातर्फे मिलिंद वैद्य यांनी स्वतः जी/ उत्तर कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पालिका विधी खात्याकडून अभिप्राय मागविला असून तो आल्यानंतर परवानगीबाबत कळविण्यात येईल, असे जुजबी उत्तर देत उद्धव ठाकरे गटाची बोळवण केली होती. मात्र तरीही मिलिंद वैद्य यांनी, पालिकेकडून परवानगी मिळो अथवा न मिळो शिवसेनेचा मेळावा होणार म्हणजे होणारच, मात्र पक्षप्रमुख जेथे सांगतील तेथे हा मेळावा घेण्यात येईल, असे सांगितले होते.
तर माजी महापौर व शिवसेना उद्धव गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्त हे शिंदे गट व भाजप प्रणित राज्य सरकारच्या दबावाखाली असल्याने परवानगी देण्याबाबत जाणीवपुर्वक चालढकल करीत असल्याचा आरोप केला होता.

मात्र आता पालिका जी/ उत्तर विभाग कार्यालयाने पोलिसांच्या हवाल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे कारण देत दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता शिवसेना उद्धव गटाला व शिंदे गटाला शिवाजी पार्क मैदान पालिकेकडून मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्धार

शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, बुधवारी नेस्को मैदानावर घेतलेल्या शिवसेना गट प्रमुखांच्या मेळाव्यात यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यात येईल, असा निर्धार व्यक्त केला होता.

हेही वाचा – ढोकळा… ठेचा… खोक्यांचा हिशेब…, ठाकरे-शिंदेंमध्ये रंगला सामना

कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता, पोलीस बंदोबस्तात वाढ

मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला कदाचित ठरल्याप्रमाणे परवानगी नाकारली जाण्याची पूर्व माहिती पोलीस व पालिकेला होती म्हणून की काय दोन दिवसांपूर्वीपासूनच शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याचा निर्धार व्यक्त केल्याने व शिवसैनिकही आक्रमक भूमिकेत असल्याने दसरा मेळाव्याच्या दिवशी शिंदे व उद्धव गटात जोरदार राडा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच, उद्धव गटाच्या शिवसैनिकांनी पोलिसांना व पालिकेला न जुमानता जबरदस्तीने मेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यास व त्यावेळी पोलिसांनी लाठीमार केल्यास नक्कीच कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता आहे.

वास्तविक, शिवसेनेला शिवाजी पार्क व्यतिरिक्त नेस्को मैदानावरच दसरा मेळावा घेण्याचा दुसरा पर्याय उलब्ध होऊ शकतो. मात्र उद्धव ठाकरे गटाने दुसरा पर्याय न निवडता शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याबाबतची आग्रही व आक्रमक भूमिका न सोडल्यास शिवाजी पार्क परिसरात दसऱ्याच्या दिवशी राडा होणार हे निश्चित.

मात्र, त्याआधीच शिवसेनेतून मुंबई पालिकेच्या विभागाला पत्र पाठवून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मागितली. त्यानंतर, लागलीच शिंदे गटातून सदा सरवणकर यांनीही दसरा मेळाव्याकरता परवानगीसाठी अर्ज केला. दरम्यान, दोन्ही गटांनी अर्ज केल्याने कोणत्या तरी एकाच गटाला परवानगी दिल्यास मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पालिकेकडून परवानगी नाकारण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त करण्यात येत होती.

बीकेसीवर परवानगी

संभाव्य परिस्थिती लक्षात घेता एकनाथ शिंदे गटाने आधीच बीकेसीच्या मैदानावर परवानगीसाठी अर्ज केला. तर, शिवसेनेनेही बीकेसीच्या दुसऱ्या मैदानावर परवानगीसाठी अर्ज केला. मात्र, एकनाथ शिंदेंच्या अर्जावर एमएमआरडीएने परवानगी दिली. तर, शिवसेनेला दिली नाही. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार एकनाथ शिंदेंना परवानगी देण्यात आली. त्यामुळे शिवाजी पार्कवरही असाच नियम लावून शिवसेनेला परवानगी द्यावी, अशी याचिका शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

दोन्ही गट उच्च न्यायालयात

दरम्यान, आज शिवाजी पार्कवर परवानगी नाकारण्यात आल्याने शिंदे गटातील समाधान सरवणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात मध्यस्थी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालय कोणाच्या बाजूने निकाल देईल, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मुंबई पालिकेने पाठवलेल्या पत्रात काय म्हटलंय?

छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क, दादर येथे दसरा मेळावा आयोजित करण्याकरिता परवानगी मिळावी म्हणून आपला विनंती अर्ज या कार्यालयात प्राप्त झालेला आहे. तसेच मा.खा. अनिल देसाई यांचे सुध्दा छत्रपती श्री. शिवाजी महाराज पार्क, दादर येथे दसरा मेळावा आयोजित करण्याकरिता अर्ज कार्यालयात प्राप्त झालेले आहेत.

मला प्राप्त अधिकारांच्या अनुषंगाने एखाद्या मैदानाच्या सार्वजनिक वापरास परवानगी देणे पूर्वी पोलीस विभागाचे अभिप्राय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक आहेत. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, शिवाजी पार्क पोलीस ठाणे, मुंबई यांचे क्र. जा.क्र.6438/2022 दि.21.09.2022 नुसार पोलीस विभागाचे अभिप्राय प्राप्त झालेले असून त्यात खालील प्रमाणे नमूद केलेले आहे.

दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळणेसाठी अर्ज केले असताना कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजीपार्कच्या संवेदनशील परीसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो

त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवण्याची शक्यता असल्याने मला उप आयुक्त, (परि.-2) या पदावरील प्राप्त अधिकारांचा वापर करुन दिनांक 05.10.2022 रोजी दसरा मेळावा साजरा करण्याकरिता प्राप्त झालेला आपला अर्ज नामंजुर करण्यात येत आहे.