अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत रविवारी (2 फेब्रुवारी) महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला. पृथ्वीराज मोहोळ याने गादी विभागात सुरुवातीला नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि अंतिम सामन्यात सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड या दोघांचा पराभव केला. मात्र शिवराज राक्षेने पराभव मान्य नसल्याचे म्हणत पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. यानंतर अंतिम सामन्यातही महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत मैदान सोडले होते. यासंदर्भात आता पंचांच्या चुकीच्या निर्णयावर संघटनेचे पदाधिकारी संदीप भोंडवे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (Big statement by council officials on the controversy in the Maharashtra Kesari competition)
पंचांच्या निर्णयावर बोलताना संदीप भोंडवे म्हणाले की, “स्पर्धा संपता संपता गादीवरील अंतिम फेरीत आणि त्याच्यानंतर महेंद्र गायकवाड व पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेल्या कुस्तीमध्ये पंचांनी जे निर्णय दिले, ते कदाचित दोन्ही पराभूत पैलवानांना मान्य नव्हते. त्यामुळे शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी कुस्ती झाल्यानंतर पंचांना शिवीगाळ करण्याचा आणि शिवराजने राक्षेने पंचांवर हात उगारण्याचा जो निर्णय घेतला, तो निषेधार्थ आहे, असे मला वाटते. कारण प्रत्येक खेळामध्ये खिलाडूवृत्ती असते. आपण जर पाहिले तर क्रिकेटमध्ये पंचांनी एखादा निर्णय दिला आणि खेलाडूला पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे, हे माहित असतानाही तो निमूटपणे मान खाली घालून मैदानाबाहेर जातो. जर आपण पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे या दोघांमधील सामन्याचा रिप्ले पाहिला तर पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा असल्याचे दिसून येते. परंतु पंचांना देवाचं स्थान आहे, असे वक्तव्य संदीप भोंडवे यांनी केले.
नेमका काय झाला वाद?
महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे आमनेसाने आले होते. यावेळी सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना पृथ्वीराजने दोन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षेला खाली पाडले. शिवराजच्या पाठीचा उजवा भाग गादीला लागला होता. परंतु, त्याची पूर्ण पाठ टेकलेली नव्हती, असे असतानाही पंचाने शिवराजला पराभूत घोषित केले. पंचांनी दिलेल्या निर्णयाशी असहमती दाखवत शिवराज राक्षे याने रिव्ह्यूची मागणी केली. परंतु, पंचांनी रिव्ह्यूची मागणी अमान्य केली. त्यामुळे चुकीचा पद्धतीने पराभूत झालेल्या शिवराज राक्षेला राग अनावर झाला आणि त्याने पंचांची कॉलर पकडत त्यांना लाथ मारली. यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी जवळपास अर्धा तास तणावाचे वातावरण होते.
हेही वाचा – Chandrahar Patil : “शिवराजने पंचाला लाथ मारणे चुकीचे होते, त्याने खरेतर…”, चंद्रहार पाटील संतापले