घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट, मविआच्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल

नाशिक पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट, मविआच्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल

Subscribe

नाशिक – नाशिक पदवीधर मतदारसंघात नवा ट्विस्ट समोर आला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील आता नॉट रिचेबल आहेत. शुभांगी पाटील आणि त्यांच्या पतीचा मोबाईल सकाळपासून बंद असल्याची माहिती निकटवर्तीयांकडून समोर येत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजपाच्या दबावाने शुभांगी पाटील अर्ज मागे घेऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेसमधील फुटीमुळे नाशिकमध्ये उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. मात्र, अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेकडून पाठिंबा मागितला. त्या शिवसेनेच्या स्वीकृत उमेदवार जाहीर झाल्याने महाविकास आघाडीच्या त्या उमेदवार असल्याचं स्पष्ट झालं होतं. दरम्यान, शुभांगी पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा याकरता भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना त्या आज नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे भाजपाकडून त्यांच्यावर दबाव असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजापने कोणीही अधिकृत उमेदवार जाहीर केला नव्हता. काँग्रेसच्या सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत सत्यजित तांबेंना संधी दिली. तांत्रिक अडचणींमुळे सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला असल्याचं सांगण्यात आलं. यावरून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त करत सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार नसल्याचं जाहिर केलं. दरम्यान, सत्यजित तांबेंनी प्रस्ताव ठेवल्यास आम्ही पाठिंबा देऊ असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. काँग्रेसचा उमेदवार फुटल्याने अपक्ष आमदार शुभांगी पाटील यांनी मातोश्रीवर धाव घेत उद्धव ठाकरेंकडे पाठिंब्याची मागणी केली. त्यामुळे अपक्ष आमदार शुभांगी पाटील या शिवसेनेच्या स्वीकृत उमेदवार म्हणून पक्षाकडून सांगण्यात आले. यामुळे महाविकास आघाडीचा पाठिंबा शुभांगी पाटील यांना देण्याचे चित्र स्पष्ट झाले.

उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असताना नाशिकमध्ये पुन्हा फासे पलटले आहेत. शुभांगी पाटील आता नॉट रिचेबल लागत असल्याने त्या उमेदावारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. भाजपाचे गिरिश महाजन गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. भाजपाचा अधिकृत उमेदवार नसतानाही त्यांनी नाशिक पदवीधरसाठी रणनीती आखली आहे. शुभांगी पाटील यांच्यावर दबाव टाकून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात येत असल्याच्या चर्चांना आता बळ आलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, शुभांगी पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिलाच नव्हता असा दावा सुभाष जंगले यांनी केला आहे. महाविकास आघाडीचा आपणच अधिकृत उमेदवार असल्याचंही सुभाष जंगले यांनी सांगितलं. नाशिक पदवीधर मतदारसंघात कोणाविरोधात लढत होणार याचं चित्र आता सायंकाळनंतरच स्पष्ट होईल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -