घरमहाराष्ट्रटिकलीचा तर्क नाही टिकला; खाकी वर्दीसमोर संभाजी भिडेंचे मौन!

टिकलीचा तर्क नाही टिकला; खाकी वर्दीसमोर संभाजी भिडेंचे मौन!

Subscribe

मुंबई : अनेकदा तर्कसंगत वक्तव्ये न करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे अलीकडेच महिला पत्रकाराला टिकली लावण्याचा सल्ला देण्यावरून चर्चेत आले. परंतु त्यांचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ते एका महिला अधिकाऱ्याला निवेदन देत आहेत आणि त्या महिला अधिकाऱ्याच्या कपाळावर टिकली किंवा कुंकूही नाही. त्यामुळे पत्रकाराला तसा सल्ला देण्यामागचे कारण काय? अशी चर्चा आता रंगली आहे.

संभाजी भिडे हे 2 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरता मंत्रालयात गेले होते. त्याबद्दल संभाजी भिडे यांच्याकडून याबाबत माहिती घेण्यासाठी एक महिला पत्रकार पुढे आली. त्यांनी संभाजी भिडे यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याआधी, ‘तू आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलेन,’ असे संभाजी भिडे यांनी सांगितले. प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरुप असते. भारतामाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो, असा सल्ला संभाजी भिडे यांनी दिला.

- Advertisement -

यावरून खूप वादंग निर्माण झाला. आपले वक्तव्य स्त्रीसन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचवणारे आहे. त्यामुळे तुमच्या भूमिकेचा खुलासा करा, असे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना दिले होते. तर, संभाजी भिडे यांनी केवळ महिला पत्रकारांचीच नव्हे तर, समस्त महिलांची माफी मागावी, अशी मागणी ठाणे महिला पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.

तर, आता सांगलीत टिपू सुलतानची जयंती साजरी करणे तत्काळ बंद करावे, अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी महिला पोलीस उपअधीक्षक मनीषा डुबुले यांना दिले. विशेष म्हणजे, त्यावेळी या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कपाळावरही कुंकू किंवा टिकली नव्हती. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून त्यांनी मौन का बाळगले, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

- Advertisement -

संभाजी भिडे यांनी 2 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला मंत्रालयात गेले होते. आतापर्यंत त्यांनी कधी टिकली वा कुंकूचा मुद्दा उपस्थित केला नव्हता. पण त्याच वेळी यावर आक्षेप का घेतला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्र्याबरोबरच्या भेटीचे कारण टाळण्यासाठीच त्यांनी पत्रकाराच्या टिकलीचा मुद्दा उपस्थित केला का, अशीही चर्चा रंगली आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -