बर्थ डेनिमित्त हातात तलवारी घेत फोटो काढणे पडले महागात; तिघांना अटक

नाशिक : मित्राच्या वाढदिवसानिमित्त हातामध्ये तलवारी घेत फोटो काढणे तीन तरुणांना चांगले महागात पडले आहे. नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट एकच्या पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४ तलवारी जप्त केल्या आहेत. नाझीम बाबर खान (वय २५, रा.गंजमाळ, नाशिक), आसिफ रऊफ शेख (वय २४, रा.भारतनगर, नाशिक), सूरज सीताराम देवरे (वय २४, रा.श्रमिकनगर, गंजमाळ, नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, तिघेजण मंगळवारी (दि.१२) तलवारी हातामध्ये घेऊन वाढदिवस साजरा करत असल्याची माहिती नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट एकचे पोलीस अंमलदार विशाल देवरे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. पथकास गंजमाळ, श्रमिकनगरमधील गीतगुंजन सोसायटीच्या बाहेर तिघे संशयित दिसले. त्यांना पथकाने ताब्यात घेत विचारपूस केली असता वाढदिवसानिमित्त बेकायदा ४ तलवारी हातामध्ये घेत फोटो काढल्याची कबुली दिली. पथकाने त्या तलवारी जप्त केल्या. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.