घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमालेगावमध्ये दादा भुसेंना अव्दय हिरेंचे आव्हान?; उध्दव ठाकरेंची सभा ठरणार निर्णायक

मालेगावमध्ये दादा भुसेंना अव्दय हिरेंचे आव्हान?; उध्दव ठाकरेंची सभा ठरणार निर्णायक

Subscribe

नाशिक : शिंदे गटात गेल्यानंतर पुन्हा मंत्रीपद लाभलेले दादा भुसे यांचे राज्य शासनातील वाढते वजन बघता आता त्यांना आव्हान देणारा ताकदीचा उमेदवार विरोधकांना लाभणे अतिशय अवघड बाब आहे असे मानले जात होते. प्रत्यक्षात शिवसेनेची झालेली तोडफोड आणि त्यातून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेला मिळालेली सहानुभूती यामुळे मालेगावचे वातावरण बदलत असल्याचे दिसून येते. त्यातच सत्ताविरोधी (अ‍ॅण्टी इन्कबन्सी) मतप्रवाहाचा फटकाही दादांना बसण्याची शक्यता असून त्याचा थेट फायदा उध्दव सेनेत दाखल झालेले अव्दय हिरे यांना होईल असे बोलले जाते. हिरे कुटुंबियांचे मालेगावातील योगदान आणि अव्दय हिरेंभोवती वाढणारी गर्दी बघता येत्या विधानसभा निवडणुकीत ते दादा भुसेंना चांगलाच घाम फोडतील असे चित्र सध्यातरी आहे.

नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्राला हिरे कुटूंबीय नवीन नाहीत. भाऊसाहेब हिरे यांच्यापासून प्रशांत हिरे, अपूर्व हिरे, अव्दय हिरे अशा सर्वांनीच राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकरणात आपला दबदबा कायम राखला आहे. आता हिरे कुटूंबातील पुढची पिढी भाजपचे युवा नेतृत्व अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवबंधन हाती बांधून मालेगावच्या मैदानात नव्या इनिंगला सुरवात केली आहे. हिरेंच्या रूपाने पुन्हा एकदा मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसेंना आव्हान उभे राहीले आहे. हिरे यांनी सेनेत प्रवेश केल्यापासून त्यांना मालेगावमधून मिळणारा प्रतिसाद पाहता २६ तारखेच्या उध्दव ठाकरेंची सभा निर्णायक ठरणार असल्याचे दिसून येते. अव्दय हिरे यांनी सभा यशस्वीतेसाठी जंगी तयारी केली आहे.

- Advertisement -

गेली तीन पंचवार्षिक निवडणूकीत सत्ताकेंद्र आपल्याकडे ठेवण्यात भुसे यांना यश आले. भुसे यांना रोखू शकेल एवढी ताकद नंतरच्या काळात विरोधकांना जमवता आली नाही. परंतु शवसेनेच्या माध्यमातून मतदारांनी कायम भुसेंना पर्यायाने शिवसेनेला साथ दिली. मात्र भुसेंनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आपसूकच उध्दव ठाकरेंना सहानुभुती वाढत गेली. परिणामी अव्दय हिरेंच्या रूपाने मालेगावमध्ये शिवसेनेला एक दमदार चेहरा लाभला आहे. शिंदे सरकारमध्ये भुसेंना मंत्रीपद जरी देण्यात आले असले तरी, त्यातून जिल्हयासाठी फारशी समाधानकारक कामगिरी होताना दिसत नाही. कामे होत असल्याचा दावा करण्यात येत असला तरी नागरिकांची नाराजी कशी दूर करणार हाही प्रश्न आहे. यावर मात करून भुसेंना आगामी निवडणुकीत आव्हान पेलावे लागणार आहे.

भुसे, हिरे यांच्यातील संघर्ष काही नवा नाही. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविणार्‍या प्रशांत हिरे यांचा दादा भुसे या नवख्या उमेदवाराने पराभव करून हिरेंच्या साम्राज्यला सुरुंग लावला. पुन्हा 2009 मध्येही आधीचा दाभाडी आणि आताच्या मालेगाव बाह्य मतदारसंघात दादा भुसेंनी विजय संपादीत करून आजपर्यंत शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला. शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्याने दादा भुसे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. निवडणूकीतील राजकीय गणिते बघता हिरेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा कृषी औद्योगिक संघ, शिक्षण संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा वेगवगेळ्या क्षेत्रात नेतृत्व केलेला हा हिरा आता ठाकरे गटाचा झाला आहे. हिरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता उध्दव ठाकरे यांनी त्यांना उपनेतेपदाची जबाबदारी दिली. हिरे कुटुंबाचा इतिहास, शिक्षण संस्थांची ताकद व सामाजिक उपक्रमातील पुढाकार भुसेंसारख्या मुरब्बी राजकारणाविरोधात काय रणनीती आखणार, त्यांच्या वाटेत किती आव्हाने उभे करणार यावरच अद्वय हिरे यांची राजकीय वाटचाल व ठाकरे गटाचे मालेगावातील भवितव्य अवलंबून आहे. २६ मार्च रोजी उध्दव ठाकरे यांची मालेगावच्या मसगा मैदानावर होणारी सभा या राजकारणाची टर्निंग पॉईंट ठरावी.

- Advertisement -
शिवसेनेतही (शिंदे) आलबेल नाही 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गिरणा अ‍ॅग्रोच्या नावाने शेअर्स गोळा करत शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा गौप्यस्फोट केला. यापूर्वीही मबोरी आंबेदरी धरणाच्या बंदिस्त कालव्यावरून वाद विकोपाला गेला. परिणामी भुसेंविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केले. शिंदे गटातही स्थानिक नेतृत्वात फारसे आलबेल चित्र नाही. महापालिका क्षेत्रातील वर्चस्वावरून भुसे विरूध्द गोडसे यांच्यात शीतयुध्द दिसून आले. याचाच परिपाक म्हणून मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीपासून गोडसे यांनी भुसेंना दूर ठेवले. आमदार सुहास कांदे आणि भुसे यांचेही फारसे पटत नाही. नियोजन समितीच्या निधी वाटपावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे एकूणच मंत्री असूनही भुसेंना स्वपक्षीयाकडूनच आव्हान दिले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -