Homeमहाराष्ट्रMohite Patil : रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या अडचणीत वाढ, भाजप मोठी 'अ‍ॅक्शन' घेण्याच्या तयारीत

Mohite Patil : रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या अडचणीत वाढ, भाजप मोठी ‘अ‍ॅक्शन’ घेण्याच्या तयारीत

Subscribe

Ranjitsinh Mohite Patil : मोहिते-पाटील यांना पक्षाने कारणे दाखव नोटीस बजावली होती. उत्तर दिल्यानंतरही आता पक्षाकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

मुंबई : माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारापासून लांब राहिलेले भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखव नोटीस बजावण्यात आली होती. याला रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उत्तरही दिले होते. परंतु, मोहिते-पाटील यांच्यावर भाजपकडून कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

लोकसभा निवडणुकीत माढ्यातून धैर्यशील मोहिते-पाटील यांना डावलून भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना तिकीट दिले होते. तेव्हापासून आमदार रणजितसिंह मोहित-पाटील हे भाजपपासून दोन हात लांब होते. नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपासून सुद्धा ते उपस्थित नव्हते. परंतु, लोकसभेनंतर पुण्यात झालेल्या भाजप प्रदेश अधिवेशनाला त्यांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा : मुंडेंवरून जुंपली! अजितदादा म्हणाले, ‘फुकट सल्ला देऊ नये’; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

अकलूज येथे महाविकास आघाडीतील खासदारांच्या सत्कार समारंभाला सुद्धा रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उपस्थिती होती. विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा माळशिरसमधून राम सातपुते यांना मैदानात उतरवले होते. पण, सातपुते यांच्या सभांनाही मोहिते-पाटील यांनी हजेरी लावली नव्हती. विधानसभेत सातपुतेंचा पराभव झाल्यावर दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी मोहिते-पाटील यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. ‘मोहिते-पाटील यांची भाजपतून हकालपट्टी करण्यात यावी,’ अशी मागणी सातपुतेंनी पक्षाकडे केली होती.

सातपुतेंच्या मागणीनुसार सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मोहिते-पाटील यांच्याविरोधात भाजपच्या हायकमांडकडे तक्रार केली होती. आमदार श्रीकांत भारतीय यांनी मोहिते-पाटील यांच्यावर कारवाई होईल, असं सांगितलं होते. त्यानंतर भाजपनेही थेट कारवाई न करता मोहिते-पाटील यांना प्रथम कारणे दाखवा नोटीस पाठवून म्हणणे मांडण्याची संधी दिली होती.

यानंतर, ‘पक्ष विरोधी भूमिका घेतली नाही,’ असा खुलासा करत मोहिते-पाटील यांनी नोटीसला उत्तर दिले होते. परंतु, मोहिते-पाटील यांच्या दाव्यानंतरही पक्षविरोधी कारवाई केल्याचे पुरावे भाजपकडे आहेत. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्या पक्षविरोधी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही कारवाई कोणत्या स्वरूपात असणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

हेही वाचा : ‘ते’ विधान भोवणार? विखेंविरोधात ठाकरेंच्या नेत्याची उच्च न्यायालयात धाव