घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या गुगलीवर भाजप पुन्हा क्लिन बोल्ड

उद्धव ठाकरेंच्या गुगलीवर भाजप पुन्हा क्लिन बोल्ड

Subscribe

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर पक्षातून आरोप होत असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभे राहिले. त्यामुळेच जाधव यांना हॅट्रिक करता आली.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत अखेर काँग्रेसला माघार घ्यायला शिवसेनेने भाग पाडत निकालच बदलून टाकला.कोणत्याही परिस्थितीत भाजप कुरघोडी करण्याची संधी सोडणार नाही, याची पूर्ण कल्पना असल्याने आधी राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाची मते आपल्याकडे वळवली. पण त्यानंतर काँग्रेसला माघार घ्यायला लावत त्यांना तटस्थ ठेवले. त्यामुळे भाजपच्या सर्व रणनितींवर पाणी फेरले गेले. राज्यातील आघाडी सरकारचे कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांनी आघाडी टिकवून राहण्यासाठी प्रसंगी एक पाऊल मागे उद्धव ठाकरेंनी टाकलेल्या गुगलीवर भाजप पुरता फसून क्लिन बोल्ड झाल्याचे या निवडणुकीत पहायला मिळाले.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण व स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेबरोबर भाजप आणि राज्यातील आघाडी सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने आपले उमेदवारी अर्ज भरले.त्यामुळे याचा लाभ उठवत भाजपने राज्यातील सरकार अस्थिर करण्याची रणनिती आखली होती. त्यामुळे या रणनीतीला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसला माघार घ्यायला लावत त्यांना मतदानापासून दूर ठेवले. एवढेच नाही तर आघाडी एकसंध आहे हे दर्शवण्यासाठी तसेच भाजपच्या कुटनीतीचा बिमोड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची मते आपल्याकडे वळवुन घेतली. उद्धव ठाकरेंच्या रणनितीमुळे भाजपच्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच समाजवादी पक्षाच्या नेत्यांना विश्वात घेत आघाडीत विष कालवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपचे सर्व प्रयत्नच व्यर्थ करून टाकले.

- Advertisement -

काँग्रेसने आपला उमेदवार दिला असता आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सेनेच्या उमेदवाराला मतदान केले असते तरीही काही फरक पडणार नव्हता. परंतु भाजपचा कोणताही डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही, सेनेसमोर काटे की टक्कर असे चित्र उभे न करता बहुमताच्या आधारे आपल्या पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल, याच राजकीय दूरदृष्टीने उद्धव ठाकरेंनी या प्रकरणात लक्षच घातले नाहीत, स्वतः जातीने सर्वांशी चर्चा करून हे साध्य केले. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या ‘सोची समझी राजनिती’मुळे बेडक्या फुगवून आव्हान निर्माण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांची हवाच काढून टाकली.

मुळात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या उमदेवारीला विरोध म्हणून कॉंग्रेसने उमेदवारी अर्ज भरले. काँग्रेसने आपला अर्ज भरण्यापूर्वी शिवसेनेला विचारले नाही, असे घडलेच नाही. मग तेव्हा काँग्रेसचे म्हणणे ऐकून न घेतल्यामुळेच त्यांनी आपले अर्ज भरले. पण हेच जर आधीच सेनेने ऐकून घेतले असते, तर कदाचित काँग्रेसने हे अर्ज भरले नसते. पण कॉंग्रेसमध्येच या निवडणुकीत उमेदवार उभा करण्यावरून गोंधळ होता. पण आधी अर्ज भरा आणि नंतर काय ते बघू असा निर्णय झाल्याने त्यांनी आपले अर्ज भरले. पण याचे दूरगामी परिणाम सरकारला भोगावे लागतील याची कल्पना आल्याने उद्धव ठाकरेंना मैदानात उतरावे लागले. पण राजकारणातील परिपक्वता पुन्हा त्यांनी दाखवून दिली आणि उतावीळ झालेल्या भाजपला जमिनीवर नाकीतोंडी आपटले.

- Advertisement -

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना पदावरून हटवण्यासाठी पक्षातील एक लॉबी सक्रिय झाली होती. त्यांनी काही मोडतोड करत व्हिडीओ बनवले आणि त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. एवढे सर्व पुरावे सादर केल्यानंतर यशवंत जाधव यांचा पत्ता शंभर टक्के कापला जाईल आपल्या माणसाची वर्णी लागेल असेच चित्र निर्माण झाले होते. पण पक्षाने जाधव यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु त्यांना पाडण्यासाठी काँग्रेसने आपली उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या पक्षातील नेत्यांना विनवणी केली जात होती. हे सर्व प्रयत्न भाजपच्या पथ्यावर पडणार होते. आपलीच लोक आपल्याच माणसाला पाडून पर्यायाने पक्षाला खड्यात घालण्याचा प्रयत्न करत आहे, ही बाब निदर्शनास येताच उद्धव ठाकरे पक्षातील कुणाला पुढे करत बाजू मांडणे योग्य ठरले नसते. त्यामुळे त्यांनी काँग्रेससह इतर मित्र पक्षांना विश्वासात घेत भाजपचे डाव हाणून पाडले.

सर्वांत महत्वाचे म्हणजे तीन – चार दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती, पण दोनच दिवसात त्यांचा विरोध तर मावळला. उलट त्यानी आजवरचा सर्व इतिहास खोटा ठरवत त्यांची मते प्रथमच सेनेकडे वळवली. सपाची मते सेनेच्या पारड्यात पाडून घेणे हे तसे सोपे नव्हते. ते आजवर तटस्थच राहिले आहेत. पण उघडपणे सेनेला मतदान करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा कल सेनेकडे आहेतच. त्यांच्या प्रयत्नाने राज्यात आघाडी सरकार स्थापन झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मत सेनेला मिळाल्यास त्याचे नवल नाही. किंबहुना आश्चर्यही नाही. परंतु सपाची मते आपल्या पक्षाकडे वळवून घेत उद्धव ठाकरे यांनी मुरब्बी राजकारण्यांचे दर्शन घडवले आहे. उद्धव ठाकरेंच्या या रणनितीमुळे भविष्यातील धोका टळला. त्यामुळे ज्या समित्यांच्या बैठकीत काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते, त्याच पक्षाने सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी सहा समित्यांच्या आपला उमेदवार दिलेले नाही. हेच तर मोठे यश मानायला हवे.

काँग्रेसने आपले अर्ज मागे घेत सेनेपुढे नांगी टाकली असे काहींना वाटेल. परंतु ज्या भाजपने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याची स्वप्ने कायम बघितली. त्या भाजपला वरचढ होण्याची संधी देईल ती काँग्रेस कोणती! भाजपला दूर ठेवणे हाच काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष मूळ उद्देश आहे. मग भाजपसाठी जर काँग्रेसने माघार घेतली तर त्यासाठी काँग्रेसवर टीका करणे योग्य ठरणार नाही. परिस्थिती विचारात घेता काँग्रेसने घेतलेला निर्णय योग्यच होता आणि उद्धव ठाकरे यांचा शब्द त्यांनी मानला हे राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचे मोठेपण आहे, असे मला वाटते.


हेहि वाचा – मेट्रो ३ प्रकल्पात ८७ टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -