सरस्वती पूजनावरून भाजपा आक्रमक तर, राष्ट्रवादीकडून टीका

मुंबई : एका व्यापाऱ्याला धमकावल्याप्रकरणी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांच्याविरोधात चेंबूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून भाजपाने भुजबळांनी सरस्वती पूजनाबाबत केलेल्या वक्तव्याचा हवाला देत टीका केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

चेंबूरचे व्यापारी ललित टेकचंदानी यांनी छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याची तक्रार चेंबूर पोलिसांकडे दिली आहे. टेकचंदानी यांनी छगन भुजबळ यांना त्यांच्या मोबाईलवर दोन व्हिडीओ पाठवले होते. भुजबळांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केल्याचे हे दोन व्हिडीओ होते. त्यानंतर लगेचच टेकचंद यांना धमकीचे फोन आणि मेसेज आले. याबाबत त्यांनी तक्रार दिल्यावर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

त्यातच, काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपीठावर छगन भुजबळ यांनी देवी सरस्वतीबद्दल वादग्रस्त विधान केले होते. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिले नाही, ज्यांना तिने शिकवले नाही. असेलच शिकवले तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवले आणि आम्हाला दूर ठेवले. त्यांची पूजा कशासाठी करायची? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला होता.

हे दोन्ही संदर्भ घेत भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केले आहे. चेंबूरच्या व्यावसायिकाला देवी सरस्वतीचा द्वेष करणाऱ्या राजकारण्याकडून धमकी, एफआयआर दाखल झाला आहे. आता देवी सरस्वतीही वाचवू शकणार नाही. महाराष्ट्रात आता हिंदुत्वाचे सरकार आहे… ये याद रखना, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या सर्वांना प्रत्युत्तर दिले. ‘भुजबळ तुम्ही महात्मा फुलेंचे खरे वारसदार शोभलात. आपल्या सत्य विधानावर जी धर्मांध मंडळी तोंडसुख घेत आहेत, त्यांना ‘सावित्री’ कळलीच नाही. नथुरामी समर्थकाना आम्ही पुरून उरू. आपल्याला सलाम. आमची माता ‘सावित्री’च. असे ट्वीट त्यांनी केले आहे.

हेही वाचा – महागाई कमी करण्याच्या नावाखाली जनतेचा केसाने गळा कापण्याचा प्रकार; ‘सामना’तून रिझर्व्ह बँकेवर टीका