रवी राणांमुळे ऐन निवडणुकीत रणजीत पाटील अडचणीत; राजा पेठ पोलिसांत तक्रार दाखल

bjp candidate in amravati graduate constituency in trouble due to mla ravi rana a case has been registered against ranjit patil

अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरु आहे. मात्र ऐन निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात पेठ पोलीस ठाण्यात अदखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी 28 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता प्रचाराची मुदत संपली असतानाही आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने डॉ. रणजीत पाटलांच्या समर्थनार्थ रविवारी महेश भवन येथे मेळावा आयोजित केला होता. त्यामुळे निवडणुक आयोगाच्या आचारसंहिता उल्लंघन प्रतिबंधक पथकाने राजा पेठ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, या तक्रारीवरून भाजप उमेदवार रणजित पाटील यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी 11 वाजता भाषण सुरु होते. ही गोष्ट आचारसंहिता उल्लंघन प्रतिबंधक पथकाच्या लक्षात आली, यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रणजीत पाटील अडचणीत सापडले आहेत.

या निवडणुकीत डॉ.रणजीत पाटील यांना जिंकून आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी संपूर्ण विभाग पिंजून काढला होता. तर महाविकास आघाडीने लिंगाडे यांच्यासाठी ताकद पणाला लावली होती. त्यांनी स्वत:ही 12 दिवस 500 हून अधिक गावांना भेट देत प्रचार केला. यात निवडणूक प्रचारात जुनी पेन्शन योजना ही महत्त्वाची बाब ठरली. निवडणुकीसाठी विभागात 262 मतदान केंद्र आहेत. यात अमरावती जिल्ह्यात 75, अकोला 61, बुलढाणा 52, वाशीम 26 व यवतमाळ जिल्ह्यात 48 केंद्रे असतील.


खराब हवामानामुळे शिंदे-फडणवीसांचा जळगाव दौरा रद्द