164 आमदारांच्या पाठिंब्याचा भाजपचा दावा, देवेंद्र फडणवीस उद्या रात्री शपथ घेण्याची शक्यता

महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलेच तापताना दिसत आहे. 10 दिवसांपासून गुवाहाटीत तळ ठोकून असलेला एकनाथ शिंदे गट आता गोव्याला रवाना होणार आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांसह कामाख्या देवीचं दर्शनही घेतलं आहे

मुंबईः महाराष्ट्रातील राजकीय संकटात मोठ्या उलथापालथी समोर येत आहेत. भाजपकडे 164 आमदार असल्याचा दावा सूत्रांनी केला असून, उद्याच उद्धव ठाकरे सरकारवर अविश्वास ठराव आणला जाणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करता न आल्यास देवेंद्र फडणवीस लगेच सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस उद्या रात्री किंवा 1 जुलै रोजी शपथ घेऊ शकतात. उद्या होणाऱ्या फ्लोअर टेस्टची आम्हाला चिंता नाही.

आमच्याकडे 50 लोक आहेत आणि आम्ही उद्या मुंबईला जाणार आहोत, असंही बंडखोर एकनाथ शिंदेंनी सांगितल्यानं ते विधान राजकीय वर्तुळात चर्चेचे ठरत आहे. आम्ही सर्वजण फ्लोअर टेस्टमध्ये सहभाग घेऊ. महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलेच तापताना दिसत आहे. 10 दिवसांपासून गुवाहाटीत तळ ठोकून असलेला एकनाथ शिंदे गट आता गोव्याला रवाना होणार आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांसह कामाख्या देवीचं दर्शनही घेतलं आहे.

आता लवकरच हे सर्वजण गोव्यात जाणार असून, उद्या ते मुंबईत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 16 आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. सर्वजण ट्रायडंट हॉटेलमध्ये राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वांना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हॉटेलवर पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली आणि फ्लोअर टेस्टची मागणी केली. त्यानंतर आज राजभवनानं पत्र काढत ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले.

महाराष्ट्रात शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटात आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर आता भारतीय जनता पक्ष सक्रिय होताना दिसत आहे. काल रात्री दहाच्या सुमारास फडणवीस राजभवनात पोहोचले आणि त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत आम्ही राज्यपालांना पत्र सादर केले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले होते. आम्ही राज्यपाल कोश्यारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेत त्यांचे बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी विनंती केली, असंसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलं.


हेही वाचाः राज्यपालांचं उद्धव ठाकरेंना पत्र, उद्धव गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत