महाराष्ट्रातल्या राजकीय संकटावर भाजपची बारीक नजर, ‘या’ पर्यायांचा विचार

सोमवारी रात्री मुंबईतून निघून गुजरातच्या सुरतमध्ये 35 आमदारांसह दाखल झालेले एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना मध्यरात्री विशेष विमानाने आसामला नेण्यात आले. बुधवारी सकाळी गुवाहाटी विमानतळावर उतरताच दोन वेगवेगळ्या बसमधून शिंदे यांच्यासह आमदारांना नेण्यात आले.

eknath shinde

नवी दिल्लीः Maharashtra Political Crisis: भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सर्व पर्यायांची चाचपणी करत आहे. परंतु राज्यातील मागील अनुभव लक्षात घेता भाजपही सावध पावलं टाकत आहे. मंगळवारी सकाळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 25 हून अधिक आमदार ‘नॉट रिचेबल’ झाल्याने महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकट कोसळले. शिवसेनेचे बंडखोर आमदार पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याने त्यांनी सुरतमधील हॉटेलमध्ये स्थलांतर केले. त्यानंतर आता सोमवारी रात्री मुंबईतून निघून गुजरातच्या सुरतमध्ये 35 आमदारांसह दाखल झालेले एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना मध्यरात्री विशेष विमानाने आसामला नेण्यात आले. बुधवारी सकाळी गुवाहाटी विमानतळावर उतरताच दोन वेगवेगळ्या बसमधून शिंदे यांच्यासह आमदारांना नेण्यात आले.

भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, पक्षाचे केंद्रीय नेतृत्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार पुढील पावले उचलतील. “पुढील पाऊल टाकण्यापूर्वी आम्हाला खात्री करावी लागेल की संख्याबळ महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आहे आणि शिवसेनेचे अधिकाधिक आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता दिसत नाही आणि मतभेदांमुळे ते पडेल.”

भाजपचे केंद्रीय नेतृत्व आकडेमोड करत असून, एकनाथ शिंदे अधिकाधिक आमदारांना आपल्या छावणीत आणतील, अशी आशा असल्याचे कळते. संख्या निश्चित झाल्यानंतर भाजप महाविकास आघाडी सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगण्याची विनंती करून राज्यपालांकडे जाईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बहुमत गमावले : भाजप नेते

भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, “अविश्वास प्रस्ताव आणण्याऐवजी आम्ही महाविकास आघाडी सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगू. शिंदे आणि इतर आमदारांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत गमावले आहे.” गेल्या काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून सरकार स्थापन केलं होतं, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, परंतु त्यांचं सरकार नंतर सत्तेत आलं नाही. तेव्हा 2019 च्या गैरप्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजप सावधपणे चालत असल्याचे भाजपच्या गोटातील एका व्यक्तीने सांगितले. “आम्ही सावधपणे पुढे जात आहोत आणि 2019 सारखे कोणतेही गैरप्रकार नको आहेत. आम्ही महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहोत, परंतु संख्याबळ आमच्या बाजूने असल्याचीही खात्री करतोय.

अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट झाली

तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांची भेट घेतली. भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, नड्डा आणि शाह राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर आणि पक्षाच्या पुढील कृतीबाबत चर्चा करत आहेत.

या महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपने आपले सर्व उमेदवार निवडून आणून सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने तीन जागा जिंकल्या, तर सत्ताधारी आघाडीला तीन जागा मिळाल्या, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली, तर शिवसेनेच्या अन्य उमेदवारांचा पराभव झाला. विधान परिषद निवडणुकीत भाजपने पाच, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराचा विजय झाला, तर काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाला.


हेही वाचाः राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण, रिलायन्स रुग्णालयात केले दाखल