भाजपला धक्का, जळगावात ११ नगरसेवक शिवसेनेत

मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेतील भाजप नगरसेवकांनी बांधले शिवबंधन

Jalgaon Shivsena

राज्यातील महापालिकांवर भाजपचाच झेंडा राहणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेत्यांकडून व्यक्त केला जात असतानाच, जळगावात मात्र भाजपला चांगलाच धक्का बसलाय. मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेतील ११ भाजप नगरसेवकांनी शिवबंधन बांधल्याने भाजपला मोठं खिंडार पडल्याचं मानलं जातंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ११ नगरसेवकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. हे सर्व नगरसेवक एकनाथ खडसे यांचे समर्थक मानले जातात. प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधलं. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर अनेक भाजप नगरसेवकांसह पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर गेले होते. मात्र, आता आगामी निवडणुकांचे पडघम वाजू लागताच खडसे समर्थक नगरसेवकांनी शिवबंधन बांधलं. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीवेळीदेखील शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक सेनेत आणत भाजपला धक्का दिला होता. त्यानंतरचा हा दुसरा धक्का मानला जातो आहे. राज्यभरात भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांचा हा सरळ पराभव मानला जातोय.