एकनाथ खडसेंची पुन्हा निराशा; राज्यसभा उमेदवारी दिली भलत्यालाच!

भाजपकडून एकनाथ खडसे किंवा संजय काकडे यांच्या नावाचा राज्यसभेसाठी समावेश करण्याऐवजी डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

eknath khadse
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे

राज्यसभेच्या ७ जागा लवकरच मुदत संपल्यामुळे रिकाम्या होणार आहेत. या जागांसाठी प्रत्येक पक्षातून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. भाजपकडून देखील काल म्हणजेच बुधवारी संध्याकाळी पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले आणि राष्ट्रवादीला रामराम करून भाजपवासी झालेले उदयनराजे भोसले यांच्यासोबत सहयोगी पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे पहिल्या यादीत नाव नसलेले एकनाथ खडसे आणि संजय काकडे या दोघांनाही दुसऱ्या यादीत नाव येईल, अशी अपेक्षा होती. तशी जोरदार चर्चा देखील सुरू झाली होती. मात्र, विधानसभेत उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या एकनाथ खडसेंची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. त्याशिवाय, उदयनराजे भोसलेंवर याच उमेदवारीच्या मुद्द्यावरून टीका करणारे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची देखील निराशा झाली आहे. कारण भाजपनं दुसऱ्या यादीमध्ये पक्षाच्या कोट्यातून उरलेली एकमेव जागा डॉ. भागवत कराड यांच्या पदरात टाकली आहे.


वाचा सविस्तर – भाजपची ज्योतिरादित्य, उदयनराजे, आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी!

‘उदयनराजे भोसलेंनी पक्षासाठी असं काय केलं? पक्षात आले आणि निवडणूक हरले’, असं म्हणत संजय काकडे यांनी उदयनराजे भोसलेंना दिल्या जाणाऱ्या उमेदवारीवर टीका केली होती. तसेच, पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळणार, असं देखील त्यांनी ठामपणे म्हटलं होतं. मात्र, आता भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीमध्ये देखील संजय काकडे याचं नाव नाही. त्यांच्या आणि एकनाथ खडसेंच्या नावावर फुली मारून भागवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संजय काकडे हे भाजपचे सहयोगी सदस्य असून त्यांना भाजपच्या तिकिटावर राज्यसभेमध्ये जायचं होतं.


वाचा सविस्तर – ‘उदयनराजेंनी असं केलं काय?’ संजय काकडेंचा सवाल!