राणी बागेतील पहिलीच सभा भाजपने गाजवली ; महापौरांनी गोंधळात कामकाज आटोपले

मुंबई: मुंबई महापालिकेची पहिली प्रत्यक्ष सभा सोमवारी भायखळा, राणी बागेतील आण्णाभाऊ साठे सभागृहात भाजप नगरसेवकांनी घातलेल्या गदारोळ, घोषणाबाजी, फलकबाजीत पार पडली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याच गदारोळात काही प्रस्ताव मंजूर करून सभेचे कामकाज अवघ्या २८ मिनिटात आटोपले. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च २०२० पासून सुरू झाला होता. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाने मुंबईत कोरोनाबाबत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परिणामी मुंबई महापालिकेची शेवटची प्रत्यक्ष सभा ही १७ मार्च २०२० रोजी पार पडली होती. त्यानंतर कोरोनाची पहिली व दुसरी लाट आल्याने पालिकेच्या प्रत्यक्ष सभा घेता आल्या नाहीत. ऑनलाईन सभा पार पडल्या. मात्र कोरोनावर नियंत्रण आल्याने विरोधक व भाजपने प्रत्यक्ष सभा घेण्याबाबत महापौर व आयुक्त यांच्याकडे वारंवार पत्र पाठवून, मागणी करून तगादा लावला होता.

अखेर २२ नोव्हेंबर पहिली प्रत्यक्ष सभा घेण्याचे ठरले ; मात्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्याने पहिली सभा कामकाज न करता पालिका मुख्यालयातील सभागृहात कशीतरी पार पडली. मात्र दुसरी सभा सोमवार २९ नोव्हेंबर रोजी भायखळा येथील राणी बागेतील शाहीर आण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत, राणी बागेतील पेंग्विन कक्षासंदर्भातील कंत्राटकामाच्या प्रस्तावाला स्थायी समिती बैठकीत भाजपच्या विरोधाला न जुमानता मंजुरी देण्यात आली. तसेच, मानखुर्द येथील घाटकोपर – मानखुर्द लिंक रोडवरील नवीन उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने अद्याप मंजूर न केल्याने या दोन कारणास्तव पालिकेतील पहारेकरी भाजपने गटनेते प्रभाकर शिंदे, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली राणी बागेतील आण्णाभाऊ साठे सभागृहात सभेच्या सुरुवातीपासून ते सभा संपेपर्यंत सलग २८ मिनिटे घोषणाबाजी, फलकबाजी, बॅनरबाजी करीत आणि प्रचंड गदारोळ घातला.

यावेळी, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी, मानखुर्द उड्डाणपुलाला छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला अग्रक्रम देण्याची मागणी वारंवार करून महापौर किशोरी पेडणेकर यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. याप्रसंगी, सभागृहात, भाजप नगरसेवकांनी, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘ जय भवानी, जय शिवाजी’, ‘ वंदे मातरम’, ‘नहीं चलेगी , नही चलेगी दादागिरी नहि चलेगी’, अशा जोरदार घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. यात भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत, दाभाडकर, विनोद मिश्रा, प्रकाश गंगाधरे, निल सोमय्या, सूर्यकांत गवळी, समिता कांबळे, ज्योती आळवणी, राजेश्री शिरवाडकर, बिंदू त्रिवेदी, उज्वला मोडक आदी नगरसेवकांनी सहभाग घेतला. तसेच, या भाजप नगरसेवकांनी सभा संपल्यानंतर पुन्हा सभागृहाबाहेरसुद्धा फलकबाजी व घोषणाबाजी करीत निदर्शने केली.