घरमहाराष्ट्रभाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे

भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा टोला

भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नव्हे, आम्ही भाजपची साथ सोडली हिंदुत्वाची नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत गेले आहेत. त्यांच्या या दौर्‍याला महाविकास आघाडी सरकारमधल्या दोन्ही घटक पक्षांची साथ मिळाली आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत अयोध्येत गेले आहेत.

यापुढे अयोध्येत येतच राहणार असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी शरयू नदीवर आरतीसाठी पुन्हा अयोध्येत येण्याची घोषणा केली. अयोध्येत उभारण्यात यावयाच्या राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणाही उध्दव ठाकरे यांनी केली. याशिवाय अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचेही जाहीर केलं. ठाकरे यांच्या अयोध्येतील भेटीच्या निमित्ताने भाजपने घटक पक्षांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. पण त्याला दोन्ही घटक पक्षांनी जराही किंमत दिली नसल्याचे उध्दव ठाकरेंच्या या दौर्‍यातून स्पष्ट झाले.

- Advertisement -

अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या मुद्यावर उध्दव ठाकरे यांनी चांगलीच उचल खाल्ली होती. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर-बाबरी मशिदीच्या वादावर तोडगा काढण्याआधी उध्दव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. तेव्हा त्यांनी पुन्हा येण्याचं सुतोवाच केलं होतं. अयोध्येतील संतांनी उध्दव ठाकरे यांच्या घोषणेचं जोरदार स्वागत केले होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने महाविकास आघाडी निर्माण करून राज्यात सत्ता स्थापन करण्यात आली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनाच निवडण्यात आले. उध्दव ठाकरे यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उध्दव ठाकरे यांनी अयोध्येतील रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला. उध्दव यांच्या या दौर्‍याला हिंदू महासभेने जाहीर विरोध केला होता.

मात्र इतर हिंदुत्ववादी संघटनांनी हा विरोध अव्हेरून ठाकरेंच्या भेटीचे जोरदार स्वागत केले. या भेटीत त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आणि पत्रकारांना संबोधित करताना भाजपला जोरदार टोला लगावला. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, असे बजावताना त्यांनी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, सोडलीय ती भाजपची साथ. अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला. हिंदुत्ववादी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यापासूनच या सरकारच्या भवितव्यावर भाजपकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपने अडचणींचे अनेक प्रस्ताव आणून सत्ताधार्‍यांमध्ये विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. यात ठाकरे यांच्या अयोध्येच्या दौर्‍याचं निमित्त करण्यात आलं होतं.

- Advertisement -

हिंदुत्ववादाच्या निमित्ताने सरकारमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न दोन्ही घटक पक्षांनी मोडित काढला. हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेनं सोडला नाही, हे या दौर्‍यातून शिवसेनेला दाखवून द्यायचं आहे. त्यामुळे या दौर्‍यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, ही चर्चा फोल ठरली आहे. ‘देवाच्या दारात राजकारणाला थारा नाही. श्रीराम सर्वांचे आहेत. ज्यांना माझ्यासोबत यायचे आहेत, ते येऊ शकतात,’ असे उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच जाहीर केलं होते. त्यांच्या आवाहनाला काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार उध्दव ठाकरे यांच्यासह अयोध्येत पोहोचले आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत ते तिथे थांबले असून त्यांच्यासोबतच त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -