भाजपला मोठा धक्का, छोटू भोयर यांचा भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश

Chotu Bhoyar

नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. पक्षावर नाराज असलेले विदर्भातील नेते भाजपचे नगरसेवक छोटू (रविंद्र) भोयर यांनी भापच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज ते कांग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती त्यांनीच दिली. भाजप नेत्यांकडून वारंवार अपमान केला जातो, असा आरोप त्यांनी केला आहे. छोटू भोयर यांच्या पक्ष सोडण्याने भाजपला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

पक्ष सोडल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यांची भूमिका मांडली. भाजपसाठी ३४ वर्षांपासून झटत आलोय. पण त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला, मला दाबण्यात आलं. अनेक नवीन लोकांना पक्षात आणले, त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला. त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं भोयर यांनी सांगितलं. तसंच, पुढे बोलताना त्यांनी आजच मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं. काँग्रेसकडून अद्यापही विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी कुठलाही शब्द देण्यात आलेला नसल्याचं देखील भोयर यांनी स्पष्ट केलं.

बानकुळेंनी मला गंडवलं

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला गंडवलं आहे, फसवलं आहे, असा आरोप छोटू भोयर यांनी केला. भाजपकडे मी विधान परिषदेची उमेदवारी मागितली होती, असं भोयर यांनी सांगितलं. तसंच, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला प्रत्येक वेळेला मी या निवडणुकीत उभा राहणार नसल्याचं सांगत आले. मात्र नेमकं उलट झालं. मला उमेदवारी नाकारण्यात आली, असं भोयर म्हणाले.

भाजपमधील एक मोठा गट मला साथ देणार

चंद्रशेखर बावनकुळे यांना २०१९ साली कामठी विधानसभा मतदारसंघातून कोणत्या कारणांमुळे उमेदवारी नाकारण्यात आली. आज ती सर्व कारणं नाहीशी झाली आहेत का? याचं स्पष्टीकरण भाजप नेतृत्वाने दिलं पाहिजे, असं भोयर म्हणाले. या मतदारसंघात भाजपकडे मोठी आघाडी आहे, असं म्हटलं जातं. मात्र १४ डिसेंबरला मतमोजणी होताना भाजपकडे जेवढी आघाडी आहे तेवढ्याच मतांनी भाजप पराभूत झालेला पाहायला मिळेल. तसंच, भाजपमधील एक मोठा गट मला या निवडणुकीत निश्चितपणे साथ देणार आहेत, असा विश्वास छोटू भोयर यांनी व्यक्त केला.

काँग्रेसकडून निवडणूक लढण्याची शक्यता

छोटू भोयर हे गेले काही दिवस नॉट रिचेबल होते. आज सर्वांच्या समोर आले. भाजप नेत्यांकडून वारंवार अपमान केला जातोय. पक्षात मोठी खदखद आहे, असे आरोप करत छोटू भोयर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. विधान परिषद नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी द्रशेखर बावनकुळे यांचं नाव जाहीर झालं. त्यामुळे भोयर नाराज आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून राजेंद्र मुळक यांना उमेदवारी देण्याची शक्यता होती. ते स्वतः यासाठी इच्छुकही आहेत. परंतु, त्यांच्या नावाला क्रीडा मंत्री सुनील केदार आणि पालकमंत्री नितीन राऊत यांची पसंती नसल्याचं कळतं. हे दोन्ही नेते छोटू भोयर यांना उमेदवारी देण्याच्या विचारात आहेत.