सरकारच्या अनास्थेमुळेच मुंबईत कोरोनाचा प्रसार; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

bjp protest against the state government
ठाकरे सरकारला अपयश आल्याचे सांगत भाजपने राज्य सरकारविरोधात आंदोलन केले. (फोटो - दीपक साळवी)

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असताना आज भाजपने सरकार विरोधात आंदोलन केले. “राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री आभासी जगात जगत आहेत. सोशल मीडियावर पेडगॅंग करून आणि काहींना प्रवक्ता करून सरकारला लढाई जिंकू”, असे वाटत असल्याची टीका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान ग्राउंड लेव्हलला परिस्थिती वेगळी असून, रुग्णांना उपचार मिळत नाही. त्यांना रस्त्यावर फिरावे लागत आहे. सरकारी रुग्णालयात जागा नसल्याची बाब त्यांनी समोर आणली आहे. राज्यभर भाजपने ठाकरे सरकारविरोधात महाराष्ट्र वाचवा आंदोलन पुकारले असून, भाजपच्या मुंबई कार्यालयाबाहेर देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विनोद तावडे यांनी आंदोलन केले, त्यावेळी फडणवीस बोलत होते.

दरम्यान यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देशातील २० टक्के कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने समोर येत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकारने २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले. देशातील छोट्या-छोट्या राज्यांनी सुद्धा पॅकेज जाहीर करण्यात पुढाकार घेतला. अशात महाराष्ट्रासारखे मोठे राज्य एकाही घटकासाठी एकही पॅकेज जाहीर करू शकत नाही, ही बाब वेदनादायी असल्याचे म्हणत हे सरकार अंग चोरून काम करत असल्याची टीका फडणवीस यांनी यावेळी केली. महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशा व्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही. केंद्राने ४६८ कोटी दिले. याशिवाय सोळाशे कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिल्याचे सांगत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

 

दरम्यान खासगी रुग्णालयांचे दर ३० हजारांपासून सुरु होत आहेत. कल्याण-डोंबिवली, ठाण्यासारख्या ठिकाणी आयसीयूचे दिवसाला १० हजार रुपये घेतले जात आहेत. सामान्य नागरिकाला उपचार घेणं शक्य होत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण देशात चार टक्के असून महाराष्ट्रात १२.५ तर मुंबईत १३.५ टक्के आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात, मुंबईत करोनाचा प्रसार झाला आहे. सगळ्या महानगर, महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला असून राज्य सरकारची त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी कोणतीही तयारी नसल्याचे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

हे वाचा – भाजपच्या रणांगणात महाविकास आघाडीचा हल्ला; ट्विटरवर भाजप ट्रोल

सगळ्यात महत्वाचे म्हणजे बीकेसी सेंटर तर दोन दिवसात भरुन जाईल, अशी परिस्थिती आहे. पाऊस पडल्यावर काय करणार माहिती नाही. तो प्रश्नही उभा राहणार आहे. रुग्ण व्यवस्थेसंदर्भात राज्य सरकारकडून कोणतीही योग्य पाऊले उचलली जात नसल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.