घरताज्या घडामोडीमी काही लेचापेचा नाही; त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन! -...

मी काही लेचापेचा नाही; त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन! – एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल!

Subscribe

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होण्याच्याही आधीपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची पक्षावर आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरची नाराजी उघडपणे व्यक्त होत होती. मात्र, नाथाभाऊंनी वारंवार तक्रारी करून देखील त्यांच्या तक्रारींचं निवारण काही केल्या झालं नाही. अखेर या सगळ्याला कंटाळून एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय झाल्यानंतर भाजपच्या राज्यातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नाथाभाऊंचा निर्णय चुकला असा सूर आळवत सगळा दोष एकनाथ खडसेंच्याच माथ्यावर मारला आहे. मात्र, एकनाथ खडसेंच्या रुपाने फक्त उत्तर महाराष्ट्रातलाच नाही तर महाराष्ट्रातला एक लोकमान्य चेहरा भाजपने गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खडसेंनी राष्ट्रवादी काँघ्रेसमध्ये झालेला प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. अजित पवार मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले…

आयुष्यातले ४० वर्ष भाजपमध्ये मी उभारणीपासून आत्तापर्यंत काम करत आलो आहे. ज्या ठिकाणी इतकी वर्ष राहिलो, तो एकाएकी सोडावासा वाटला नाही. सभागृहात मी वारंवार विचारायचो की माझा गुन्हा काय आहे. गैरव्यवहार असेल तर त्याचे कागदपत्र द्या. अन्याय असेल, तर सांगा. पण मला उत्तर मिळालं नाही. मी खूप संघर्ष केला. भाजपमध्येच नाही तर मंत्रिमंडळात देखील संघर्ष करावा लागला. संघर्ष करणं हा माझा स्थायी स्वभाव आहे. भाजपच्या उत्तर महाराष्ट्रात ६ जागा खासदारकीच्या यायच्या. त्यातल्या सलग ५ जागा मी निवडून आणल्या. १० निवडणुकांमध्ये जळगावमध्ये १७ खासदार आम्ही सातत्याने निवडून आणले. आख्ख्या उत्तर महाराष्ट्रात ६ पैकी ५ खासदार निवडून गेले.

- Advertisement -

समोरासमोर मी लढलो. पण कधी एकमेकांविषयी विद्वेषाची भावना नाही ठेवली. मी पाठीत खंजीर कधी खुपसला नाही. समोर ज्येष्ठ म्हणायचं आणि पाठीत खंजीर खुपसायचं हे मी कधी केलं नाही. महिलेला समोर ठेऊन कधीच राजकारण केलं नाही. कुणालातरी समोर ठेऊन आरोप करायचे हे मी कधी केलं नाही. मी काही लेचापेचा नाही. जयंत पाटलांना म्हणालो. मला राजकारणात यायचंय. जयंत पाटील म्हणाले. ते ईडी तुमच्या मागे लागेल. मी म्हटलो ते ईडी लावतील, तर मी सीडी लावेन.

भाजपनं मला अडगळीत टाकलं होतं. रोहणीला तिकीट दिलं, ते मी माहितलं नव्हतं. जबरदस्तीनं मला तिकीट दिलं गेलं. मला म्हणतात नाथाभाऊंना एवढं दिलं, मग पक्ष सोडायची गरज काय? मग नाथाभाऊंनी पक्षासाठी एवढं काम केलं, त्याचं काय? उभं आयुष्य पक्षासाठी दिलं. त्यामानाने तुम्ही काय केलं? अँटी करप्शन, सीबीआय? राष्ट्रवादीत येताना मी कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. मी शब्द देतो, जितक्या निष्ठेनं भाजपचं काम केलं, तितक्याच निष्ठेनं राष्ट्रवादीचं काम करीन. भाजप जितक्या वेगानं वाढली, त्याच्या दुप्पट वेगानं राष्ट्रवादी वाढवून दाखवू. आणि मी तुम्हाला हे करून दाखवीन.

- Advertisement -

पक्ष सोडणं माझी इच्छा नव्हती, पण ती कार्यकर्त्यांची भावना होती की आता भाजप सोडलं पाहिजे. कार्यकर्त्यांची इच्छा होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायची. इतर पक्षांच्याही मला ऑफर होत्या. दिल्लीतल्या वरिष्ठांशी देखील मी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला भाजपमध्ये भवितव्य नाही. दिल्लीतल्या वरिष्ठांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला सांगितलं. भाजपमध्ये बरेच लोकं आहेत जे कंटाळले आहेत. पण ते बोलू शकत नाहीयेत. मोठ्या पदावर असलेल्या लोकांनाही वाटतंय. पण ईडीची भिती वाटतेय. पण आता नाथाभाऊची ताकद काय आहे, हे मी पुढच्या काळात जळगावमध्ये कार्यक्रम घेऊन तुम्हाला दाखवून देईन.

आता डोक्यावरचं ओझं गेल्यासारखं वाटतंय. एकदम हलकं हलकं वाटतंय. रात्री उशीरा मला दिल्लीवरूनही फोन आले. समजूत घालण्याचे. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण होत असेल, तर अशा पक्षात मला राहायचं नाही, हे मी त्यांना सांगितलं. काही दिवस जाऊ द्या. कुणी किती भूखंड घेतले हे मी तुम्हाला दाखवेन.

मला आता उभ्या आयुष्यात कधी भाजपनं तिकीट दिलं नसतं. का दिलं नसतं? म्हणाले असते तुम्ही मार्गदर्शन करा. हे कोण सांगत होते, ज्यांनी ४ दिवस काढले भाजपमध्ये, ते मार्गदर्शन करायला सांगतात. अनेकजण म्हणतात तुम्ही राष्ट्रवादीवर अनेकदा टीका केली आहे. मी म्हटलं विरोधी पक्षनेता होतो. माझं काम निष्ठेनं केलं. तुम्ही पहाटे ५ वाजता शपथ घेतली, तेव्हा तुमची नीतिमत्ता कुठे गेली होती? तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस चांगली वाटली, मला आज त्याहून चांगली वाटली.


यावेळी शरद पवार म्हणाले…

येणाऱ्या काळात पुन्हा एकदा जळगाव राष्ट्रवादीच्या विचारांनीच काम करणार आहे हे पुन्हा दिसून येईल. नाथाभाऊंचं एक स्पष्ट आहे. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची, मग मागेपुढे बघायचं नाही. जळगावमध्ये राष्ट्रवादी वाढवण्याचा त्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे त्यावर शंका बाळगायचं कारण नाही.

गेले काही दिवस महाराष्ट्रात टीव्हीवर एकच बातमी होती. नाथाभाऊ. मध्येच कुणी जाहीर केलं की अजितदादा नाराज आहे. कशाला नाराज आहेत? कोरोनाच्या संकटात सगळ्यांनीच काळजी घ्यायची गरज आहे. आपण लोकांच्यामध्ये राहणारे लोकं आहोत. त्यामुळे वेळप्रसंगी काळजी घ्यायला हवी. राज्य सरकारमध्ये जितेंद्र आव्हाड, संजय बनसोडे, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे या सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यासाठी खबरदारी कुणी घेतली तर लगेच काहीतरी गडबड झाली असं नाही. मंत्रिमडळात कोणतेही बदल होणार नाहीत. कुणीही नाराज नाही.


यावेळी जयंत पाटील म्हणाले…

मी आधी देखील खडसेंना पक्षात येण्याबद्दल विचारलं होतं. पण माझा पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही, असा त्यांना विश्वास होता. गोपीनाथ मुंडेंसोबत खडसेंनी भाजप वाढवण्याचं काम केलं. पण कानामागून आला आणि तिखट झाला असे प्रकार भाजपमध्ये झाले. खडसेंवर नेहमीच भाजपमध्ये अन्याय झाला. माध्यमांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे. पण आम्ही सर्वांनी काही देतो असं सांगून खडसेंशी कधीच चर्चा केलेली नाही. एका वेगळ्या विचाराने ते भाजप सोडून आले आहेत.

सोशल डिस्टन्सिंग पाळून कार्यक्रम घ्यायचा आदेश पवार साहेबांनी दिला होता. मी म्हटलं होतं ५०च खुर्च्या घालू. पण इतक्या संख्येनं लोकं आत आले त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा आहे. राज्याच्या विधानसभेत १९९० साली खडसे भाजपकडून पहिल्यांदा विधानसभेत आले. तेव्हापासून मीही सभागृहात आहे. मधुकरराव चौधरी विधानसभेचे अध्यक्ष असताना अनेकदा खडसेंनी दाखवून दिलंय की विधिमंडळाचा सदस्य काय करू शकतो. खडसेंची विरोधी पक्षनेता म्हणून कारकिर्द देखील आम्ही पाहिली.

खडसेंसारखा दिग्गज नेता २०१४ साली आलेल्या भाजपच्या सरकारमध्ये मंत्री होता. पणपहिल्या रांगेत बसलेल्या नेत्याला मागच्या रांगेत बसवण्याचं काम भाजप सरकारमध्ये झालं. सभागृहात खडसेंवर चालू असलेल्या अन्यायावर मीच सगळ्याच जास्त बोललो असेन. आज त्यांना कळेल की अभीभी पिक्चर बाकी है. महाराष्ट्रात सूडाचं राजकारण कधीही पाहिलं नाही.

२०१९च्या निवडणुकीआधी आम्ही सगळे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. लोकसभेत आमच्या पक्षाला मोठा फटका बसला. विधानसभा निवडणुकीत भलेभले लोकं आम्हाला सोडून गेले. पण आम्ही सगळे शरद पवारांवर ठाम विश्वास ठेऊन होतो. पवारांना ईडीची नोटीस देण्यापर्यंत मजल गेली. ७९ वर्षांचे शरद पवार महाराष्ट्रभर फिरले. त्यातून आजच्या सरकारचा पाया रचला गेला. आमचं तीन पक्षांचं सरकार आहे. महाराष्ट्रात अतीवृष्टी झाली, पूर आला तिथे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं.


दरम्यान, २ वाजता होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ३.३० वाजता सुरू झाल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. कारण राष्ट्रवादीचे सर्व नेते पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कार्यालयात असताना शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड वाय बी सेंटरवर दोघंच चर्चा करत होते. जितेंद्र आव्हाडांचं खातं एकनाथ खडसेंना दिलं जाण्याची चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवरच ही बैठक झाल्याचं बोललं जात होतं.

#Live : ४० वर्ष भाजपवासी असलेले फायरब्रँड एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

#Live : ४० वर्ष भाजपवासी असलेले फायरब्रँड एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, October 23, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -