शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा १०० कोटींचा घोटाळा

किरीट सोमय्यांचा आरोप

शिवसेनेचे जालन्याचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 100 कोटी घोटाळ्याचे आरोप केले आहेत. जालना साखर कारखाना बेनामी पद्धतीने फसवणुकीने त्यांनी हडप केला असल्याचे त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी मुळ्ये आणि तापडिया यांच्यावर ईडीने औरंगाबादेत छापे टाकले होते. मात्र, हा कारखाना त्यांनी नाही तर अर्जुन खोतकर यांनी घेतला असल्याचा थेट आरोप किरीट यांनी केला. राज्य सरकारची 100 एकर जमीन खोतकर हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

भाजप नेते किरिट सोमय्या हे शुक्रवारी औरंगाबाद दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारसह शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली. अर्जुन खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा आणि एक हजार कोटींची शेतकर्‍यांची जमीन हडपण्याचे काम केले आहे. मी त्याची तक्रार केली असून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होईल, यात शंका नाही, असेही सोमय्या यांनी म्हटले.

सोमय्यांचा बोलवता धनी दानवे

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली नाही तर घ्यायला लावली. मी साखर कारखान्याचा मालक नसून भागधारक आहे. जर कारखाना शंभर कोटींचा असेल तर कारखाना मालकाला बोलून किरीट सोमय्या यांना हा कारखाना शंभर कोटीमध्ये द्यायला लावू. सोमय्या यांची पत्रकार परिषद पाहिली नाही. त्यांचा बोलविता धनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आहेत, असा आरोप शिवसेनेचे नेते, माजी खासदार अर्जुन खोतकर यांनी केला आहे.