मुंबई : माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) नेते, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक दावे केले आहेत. भाजप नेते, मोहित कंबोज यांनी हत्येपूर्वी बाबा सिद्दीकी यांच्याशी संवाद साधला होता, असं झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे. तसेच, झिशान सिद्दीकी यांनी काही बिल्डर्सची नावे देखील घेतली आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
झिशान सिद्दीकी यांनी जबाबात उल्लेख केल्याचं समजातच मोहित कंबोज यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘आम्ही दोघे नेहमी एकमेकांशी बोलायचे. त्यात अनेकदा निवडणुकीचा विषयही असायचा,’ असं मोहित कंबोज यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : पुण्यात राऊतांसमोर माजी आमदार तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले, नाराजीचं कारण अंधारे की…
मोहित कंबोज म्हणाले, “बाबा सिद्दीकी हे माझे चांगले मित्र होते. 15 वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. ते ‘एनडीए’चा भाग होते. आम्ही दोघे नेहमी एकमेकांशी बोलायचो; त्यात अनेकदा निवडणुकीचा विषयही असायचा. बाबा सिद्दीकींची हत्या केल्यावर मला मोठा धक्का बसला होता. मी त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी रूग्णालयात सुद्धा गेलो होते. दुर्दैवाने आम्ही सगळ्यांनी बाबा सिद्दीकींसारखा मित्र गमावाल. याप्रकरणातील सत्य बाहेर येईल आणि योग्य तो न्याय होईल.”
झिशान यांचा पोलीस जबाब काय?
बाबा सिद्दीकी हे रोजनिशी डायरी लिहायचे. 12 ऑक्टोबर 2024 ला सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्या होण्याच्या काही तासांपूर्वी लिहिलेल्या डायरीत बाबा सिद्दीकी यांनी मोहित कंबोज यांचा उल्लेख केला होता.
“मला कळले की कंबोज यांनी 12 ऑक्टोबरला 5.30 ते 6.00 च्या दरम्यान माझ्या वडिलांशी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संवाद साधला होता. वांद्रे पूर्वमधील मुंद्रा बिल्डर्स आणि माझ्या वडिलांशी भेट घालून देण्याचा प्रयत्न कंबोज करत होते. याच मुंद्रा बिल्डर्सने झोपडपट्टीवासीयांशी संवाद साधताना माझ्या वडिलांबद्दल अपशब्द वापरले होते. याचे व्हिडिओ मला मिळाले होते,” असं झिशान यांनी म्हटलं आहे.
24 ऑक्टोबरला पोलिसांनी झिशान सिद्दीकींचा जबाब पोलिसांनी नोंदवला होता. त्यात झिशान सिद्दीकींनी म्हटलं की, “वांद्रे पूर्ण आणि पश्चिम येथील ‘एसआरए’ प्रकल्पासाठी मी लढा देत होतो. बिल्डर्स अन्याय करत असल्याने अनेक नागरिक माझ्याशी संपर्क साधत होते.”
“अनेक बिल्डर्स, त्यात प्रिथी चव्हाण, शाहिद बालवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका, परवेज लखडावला, मुंद्रा बिल्डर्स, विनय ठक्कर, ओकांर बिल्डर्स आणि भाजपचे नेते मोहित कंबोज हे रोज माझ्या वडिलांच्या संपर्कात होते,” असं झिशान सिद्दीकींनी जबाबात सांगितले आहे.
हेही वाचा : पुण्यात ‘NCP’च्या नेत्यानं एका व्यक्तीला उचलून आपटले, अजितदादा संतापले; थेट फोन केला, पण…