तुम्हाला कसा नेता हवा?घडवणारा की बिघडवणारा?, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्हाला कसा नेता हवा आहे? पिढी घडवणारा नेता हवा आहे की, बिघडवणारा नेता हवा आहे? असा सवाल उपस्थित करत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

बीड येथील कौठळीमध्ये जल जीवन मिशन योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली. काहीच दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यावेळी पंकजा यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली होती. मात्र, आता मुंडे पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत.

तुम्हाला कसा नेता हवा आहे? घरा-घरात पाणी देणारा नेता हवा आहे की, घरा-घरात चपटी देणारा नेता हवा आहे. पिढी घडवणारा नेता हवा आहे की, बिघडवणारा नेता हवा आहे? असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.

मुंडे साहेबांनंतर तुम्ही सगळे माझे नाव घेता. कारण तुम्हाला चांगला नेता हवा आहे. मी निवडणूक हरले आणि तुमचे मोबाइलवरचे मेसेज बंद झाले, अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

परळीमध्ये भुयारी गटार योजनेच्या नावाखाली रस्ते फोडले. त्यानंतर विकास केल्याची दवंडी पेटवली जातेय. योजना केंद्राची, सरकार आमचे आणि उद्धाटनाला भलतेच पुढे येतात, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला.


हेही वाचा : कोण इम्तियाज जलील?, नशीब ठाकरेंनी त्यांना पाठिंबा नाही दिला; आशिष शेलारांचा हल्लाबोल