मंत्रिपदावर नसल्याचे दुःख नाही; पंकजा मुंडेंनी फडणवीसांना टोला लगावल्याची चर्चा

bjp leader pankaja munde reaction after devendra fadnavis controversial statement
मंत्रिपदावर नसल्याचे दुःख नाही; पंकजा मुंडेंनी फडणवीसांना टोला लगावल्याची चर्चा

मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही याचे मला दु:ख नाही. त्यामुळे मी त्याची फार आठवण काढत नाही, असे विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी केले. मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखेच वाटते, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यानंतर लगेचच पंकजा मुंडे यांचे हे वक्तव्य आल्यामुळे त्यांच्या या विधानामाचा रोख फडणवीस यांच्याकडे असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.

सत्तेत नाही याचे दुःख नाही. सत्तेत जनता असली पाहिजे. सत्तेच्या खूर्चीवर कोण व्यक्ती आहे याला महत्त्व नाही. त्याची प्रवृत्ती काय याला महत्त्व आहे. मी कोणत्या मंत्रिपदावर नाही याचे मला दु:ख नाही. त्यामुळे मी त्याची फार आठवण काढत नाही. मी अमुक एका पदावर नाही, मात्र माझ्या हातात असते तर मी केलं असते, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

केंद्राकडून किती निधी आणला असा सवाल सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे यांनी केला होता. त्यावरही पंकजा मुंडे यांना विचारले असता, आता मी विचारण्याच्या भूमिकेत आहे. जेव्हा उत्तर द्यायच्या भूमिकेत होते तेव्हा उत्तरे दिली आहेत. आता पुन्हा जेव्हा उत्तर द्यायच्या भूमिकेत येईन तेव्हा उत्तर देईन.

तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या धाडींवरही पंकजा यांनी प्रतिक्रिया दिली. वसुली करणे, चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणे आदींशी संबंधित लोकांवर अंकूश असलाच पाहिजे. चुकीचे काही होत असेल तर चौकशी झालीच पाहिजे. त्यात काही गैर नाही. ज्यांच्यात उत्तर देण्याची क्षमता असेल ते यातून बाहेर पडतील, असे त्यांनी सांगितले.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण असेल या सवालावर पंकजा यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. याबाबत जनताच सांगेल. या प्रश्नाची व्याप्ती मोठी आहे. आताच्या मुख्यमंत्र्यांनी चांगले निर्णय घेतले तर तेही त्याचा भाग होऊ शकतात. त्यांना शुभेच्छा देते. जो व्यक्ती जनतेच्या हिताचा निर्णय घेईल जनता त्याला मनात स्थान देईल, असेही मुंडे म्हणाल्या.


हेही वाचा – राज्य सरकारची आमदारांना दसऱ्याची भेट; आमदार निधी चार कोटींवर